अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या पतीवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मध्यावधी निवडणुकांमध्ये हिंसक घटना घडण्याचा अमेरिकी यंत्रणांचा इशारा

Department-of-Homeland-Securityवॉशिंग्टन – पुढील महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात लोकप्रतिनिधी, राजकीय उमेदवार तसेच निवडणूक अधिकाऱ्यांवर हल्ले होण्याचा धोका वाढल्याचा इशारा सुरक्षायंत्रणांनी दिला. शनिवारी पहाटे अमेरिकी संसदेतील प्रतिनिधीगृहाच्या सभापती असणाऱ्या नॅन्सी पेलोसी यांचे पती पॉल यांच्यावर हातोड्याच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोर आक्रमक व टोकाच्या विचारसरणीचा समर्थक असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षायंत्रणांचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

शनिवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास सॅनफ्रान्सिस्को शहरातील नॅन्सी पेलोसी यांच्या निवासस्थानात हल्लेखोराने घुसखोरी केली. पेलोसी यांचे पती पॉल पेलोसी यांनी दार उघडल्यावर हल्लेखोराने दोनदा नॅन्सी पेलोसी कुठे आहेत अशी विचारणा केली. पॉल यांनी उत्तर न देता पोलिसांना फोन लावला. त्याचवेळी हल्लेखोराने घरात प्रवेश करून हातोड्याच्या सहाय्याने पॉल पेलोसी यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला तसेच हाताला मार लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.

paul-pelosi-and-house-minority-leader-nancyहल्लेखोराचे नाव डेव्हिड डिपॅपे असल्याचे समोर आले असून तो आक्रमक व टोकाच्या विचारसरणीचा तसेच ‘कॉन्स्पिरसी थिअरीं’चा समर्थक असल्याचे सांगण्यात येते. हल्लेखोराकडे कोरोनासंदर्भातील धोरणांना विरोध करणारी पत्रके सापडल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. हल्ल्याची घटना घडली त्यावेळी सभापती नॅन्सी पेलोसी राजधानी वॉशिंग्टनमध्ये होत्या, अशी माहिती सुरक्षायंत्रणांनी दिली. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तसेच रिपब्लिकन नेत्यांनी पेलोसी यांच्या पतीवरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

दरम्यान हल्ल्याची ही घटना समोर येत असतानाचा अमेरिकेतील सुरक्षायंत्रणांनी मध्यावधी निवडणुकांमधील हिंसाचाराबाबत इशारा जारी केला. ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’, ‘एफबीआय’, ‘नॅशनल काऊंटरटेररिझम सेंटर’ व ‘युएस कॅपिटल पोलीस’ यांनी संयुक्तरित्या बुलेटिन प्रसिद्ध केले. त्यात पुढील महिन्यात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय उमेदवार, लोकप्रतिनिधी तसेच निवडणूक यंत्रणेच्या अधिकाऱ्यांवर हल्ले होऊ शकतात, असे बजावले आहे. देशांतर्गत पातळीवर आक्रमक व टोकाची विचारसरणी असणारे गट तसेच व्यक्ती अशा प्रकारचे हल्ले घडविण्याचा धोका आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले.

leave a reply