दक्षिण आफ्रिकेतील दंगलीत 70हून अधिक जणांचा बळी – 25 हजार जवान तैनात करण्याचे संकेत

केपटाऊन – दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना झालेल्या तुरुंगवासाच्या मुद्यावरून देशात भीषण दंगली भडकल्या आहेत. या दंगलींमध्ये आतापर्यंत 70हून अधिक जणांचे बळी गेले असून मालमत्तेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दक्षिण आफ्रिक्रेत 1994 साली झालेल्या सत्तापालटानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात असंतोष व हिंसाचार पहायला मिळत असल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे.

70हून अधिक2009 ते 2018 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष असणार्‍या जेकब झुमा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात तपासात सहकार्य न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. गेल्या आठवड्यात जेकब झुमा यांनी आपण शरण येणार नसल्याचे बजावले होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी अटक करण्याचा इशारा दिल्याने 79 वर्षांचे झुमा यंत्रणांसमोर हजर झाले होते. एखादा माजी राष्ट्राध्यक्षांना तुरुंगात जावे लागण्याची दक्षिण आफ्रिकेतील ही पहिलीच घटना ठरली आहे.

70हून अधिकजेकब झुमा तुरुंगात जाण्यापूर्वीच त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली होती. झुमा यांचे समर्थक असणार्‍या ‘क्काझुलु-नताल’ व ‘गॉतेंग’ भागात अटकेपूर्वी मानवी साखळी उभारण्यात आली होती. माजी राष्ट्राध्यक्षांना तुरुंगात जाणे भाग पडल्यानंतर समर्थकांचा उद्रेक झाला असून दोन्ही प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने, हिंसाचार व जाळपोळ सुरू झाली आहे. गेल्या पाच दिवसात दोन्ही प्रांतांमधील अनेक मॉल्स, कारखाने, दुकाने तसेच गाड्यांना आगी लावण्यात आल्या आहेत.

‘क्काझुलु-नताल’ व ‘गॉतेंग’ प्रांतात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 72 जणांचा बळी गेला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. सुरक्षायंत्रणांनी हिंसाचार व जाळपोळ करणार्‍या 1200 हून अधिक जणांना अटक केली आहे. सध्या या दोन प्रांतांमध्ये अडीच हजार लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. मात्र इतर प्रांतांमध्येही हिंसाचाराचे लोण पसरल्याने ही संख्या अपुरी पडत असून, येत्या काही दिवसात तब्बल 25 हजार जवान तैनात करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

झुमा यांना झालेला तुरुंगवास हा दंगलीमागचा मुख्य घटक ठरला असला, तरी त्यामागे इतर घटकही कारणीभूत असल्याचे विश्‍लेषकांनी म्हटले आहे. जेकब झुमा यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटविल्यानंतर सत्ताधारी पक्षात अस्थैर्य निर्माण झाले आहे. त्यावर तोडगा काढण्यात नवे राष्ट्राध्यक्ष सिरील राम्फोसा यांना अपयश आले आहे. त्यातच कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतील अर्थव्यवस्था मंदावली असून गरिबी व बेकारीचे प्रमाण वाढले आहे. झुमा यांच्या अटकेच्या निमित्ताने या असंतोषाचा उद्रेक झाल्याचा दावा माध्यमांनी केला आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील दंगलींमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांशी संपर्क साधला असून भारतीयांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

leave a reply