जगभरात चोवीस तासात कोरोनाच्या साथीचे ७५००हून अधिक बळी

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसने गेल्या चोवीस तासात जगभरात घातलेल्या थैमानात ७५०० हून अधिक जणांचा बळी घेतला असून अमेरिकेत एका दिवसात २३०० जण दगावले आहेत. याबरोबर जगभरात या साथीत एकूण १,२९,०९९ दगावले असून आतापर्यंत या साथीतून पाच लाख जण औषधोपचारानंतर ठीक झाले आहेत. पण गेल्या दोन आठवड्यात या साथीची लागण झालेल्यांची संख्या दुप्पटीने वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. जगभरात २०,२६,८२३ जणांना या साथीची लागण झाली आहे.

अमेरिकेत आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक बळींची नोंद झाली आहे. जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने बुधवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत एकूण २८,३०० जण दगावले आहेत. या साथीने जगभरात दगावलेल्यांपैकी जवळपास २० टक्के बळी अमेरिकेत गेले आहेत. तर गेल्या चोवीस तासात अमेरिकेत २५ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या ६,१४,२४६ वर पोहोचली आहे.

ब्रिटनमध्ये गेल्या चोवीस तासात या साथीने ७६१ जणांचा बळी गेला असून ४६०० नवे रुग्ण आढळले आहेत. ब्रिटनमधील या साथीची लागण झालेल्यांची संख्या एक लाखाजवळ पोहोचली आहे. ब्रिटनच्या सरकारने या साथीविरोधात सुरू केलेल्या लढ्याला ब्रिटीश जनतेचे सहकार्य मिळत असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. पण या साथीमुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर कमालीचा ताण पडत असून येत्या काळात ब्रिटीश अर्थव्यवस्थेला गंभीर परिणामांसाठी तयार रहावे लागेल, असा इशारा ब्रिटनचे अर्थमंत्री रिषी सुनक यांनी दिला.

जपानमध्ये या साथीचे एकूण १४६ जणांचा बळी गेला असून ८१०० जणांना या साथीची लागण झाली आहे. जपानच्या आरोग्य मंत्रालयाने या साथीबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. ही साथ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लस शोधली नाही तर जपानमध्ये किमान चार लाख जणांना प्राण गमवावे लागतील, अशी भीती आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली. त्याचबरोबर या साथीची लागण झालेल्या साडेआठ लाख रुग्णांना व्हेन्टिलेटर्सची आवश्यकता असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

leave a reply