इराकमधील मोसादच्या ‘सेफ हाऊस’वर हल्ला

- मोसादचे एजंट्स मारले गेल्याचा इराकी वृत्तसंस्थेचा दावा

‘सेफ हाऊस’इरबिल/तेहरान – इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या स्फोटाचे पडसाद इराकमध्ये उमटल्याचा दावा केला जातो. इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या इराकमधील सेफ हाऊसवर इराणसंलग्न गटांनी हल्ला चढवून मोसादच्या एजंट्सना ठार केले. इराकमधील इराणसंलग्न वृत्तसंस्थेने ही बातमी प्रसिद्ध केली व लवकरच यासंबंधीचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्याची घोषणा केली आहे. मात्र, इराकमधील मोसादच्या सेफ हाऊसवर हल्ला झाल्याचा इराकी वृत्तसंस्थेचा हा दावा येथील कुर्द सरकारने फेटाळला आहे.

इराकच्या उत्तरेकडील कुर्दिस्तानमध्ये मोसादचे सेफ हाऊस असल्याचा दावा ‘हकरकत हिजबुल्लाह अल-नुजाबा’ या इराकमधील इराणसंलग्न संघटनेच्या वृत्तसंस्थेने केला. बुधवारी सकाळी या सेफ हाऊसवर इराणसंलग्न गटाने हल्ला चढवून येथे दडलेल्या मोसादच्या एजंट्सना ‘सेफ हाऊस’ठार केले. त्यानंतर या सशस्त्र गटाने हे सेफ हाऊस उद्ध्वस्त केल्याची माहिती सदर वृृत्तसंस्थेने जाहीर केली. इराकमधील या इराणसंलग्न गटाचे नाव जाहीर करण्याचे सदर वृत्तसंस्थेने टाळले. इराणच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने देखील मोसादच्या सेफ हाऊसवरील या हल्ल्याची बातमी प्रसिद्ध केली.

‘सेफ हाऊस’रविवारी इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात स्फोट झाला. यासाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप इराणने केला आहे. तसेच नातांझ प्रकल्पात हल्ला चढविणार्‍या इस्रायलचा सूड घेण्याची धमकी इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी दिली होती. इस्रायलने याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. पण आता इराकमधील मोसादच्या सेफ हाऊसवरील हल्ल्याची बातमी खरी असेल तर इराणने इस्रायलला जबर हादरा दिल्याचा दावा केला जातो.

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसाद इराकमध्ये सक्रीय आहे. १९६६ साली मोसादच्या एजंटने इराकचे ‘मिग-२१’ विमान इस्रायलमध्ये उतरविण्याची थक्क करणारी कारवाई केली होती. तर काही वर्षांपूर्वी मोसादचे प्रमुख योसी कोहेन यांनी इराकच्या कुर्दिस्तानमार्गे इराणमध्ये घुसून इराणी अणुकार्यक्रमाची कागदपत्रे, पुरावे चोरून सुरक्षितरित्या बाहेर निघाल्याचा दावा केला जातो. त्यामुळे इराकमधील मोसादच्या सेफ हाऊसवरील कारवाईला इस्रायलकडून प्रत्युत्तर मिळू शकते.

leave a reply