युएईच्या किनारपट्टीजवळ इस्रायली मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र डागले

- आखाती माध्यमांचा दावा

मालवाहूदुबई/जेरूसलेम – पर्शियन आखात ते भूमध्य सागरी क्षेत्राच्या पट्ट्यात इराण आणि इस्रायलमध्ये पेटलेल्या अघोषित युद्धाची तीव्रता वाढली आहे. मंगळवारी इस्रायलच्या ‘हायपेरियॉन रे’ या मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाला. इराणनेच हा हल्ला घडविल्याचा दाट संशय व्यक्त केला जातो. गेल्या दीड महिन्यात इस्रायली मालवाहू जहाजावर झालेला हा तिसरा हल्ला ठरतो. नातांझ येथील अणुप्रकल्पात झालेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून इराणने इस्रायली जहाजाला लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लेबेनॉनमधील ‘अल मयादीन’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कुवैतहून युएईला जाणार्‍या ‘हायपेरियॉन रे’ या मालवाहू जहाजावर मंगळवारी क्षेपणास्त्र हल्ला झाला. युएईच्या फुजैरा शहराच्या किनारपट्टीजवळ हा हल्ला झाल्याची माहिती अल मयादीन या हिजबुल्लाह संलग्न वृत्तवाहिनीने दिली. तर इराणमधील ‘अल-आलम’ वृत्तवाहिनीने देखील इस्रायली जहाजावरील हल्ल्याचे वृत्त दिले आहे. यानंतर इस्रायली माध्यमांनी ही बातमी उचलून धरली.

या हल्ल्यात सदर जहाजाचे नुकसान झाले नसल्याचे इस्रायली वृत्तवाहिनीने म्हटले आहे. तसेच हायपेरियॉन रे जहाज युएईमध्ये दाखल झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. इराणने क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे या जहाजावर हल्ला चढविल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला आहे. गेल्या दीड महिन्यात ओमानचे आखात ते हिंदी महासागरी क्षेत्राच्या पट्ट्यात इस्रायली जहाजावर झालेला हा तिसरा हल्ला ठरतो.

याआधी २६ फेब्रुवारी रोजी ओमानच्या आखातात ‘हेलियॉस रे’ या जहाजात स्फोट झाला होता. लिम्पेट माईनचा वापर करून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी हा हल्ला घडविल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. तर २५ मार्च रोजी हिंदी महासागर क्षेत्रात प्रवेश करणार्‍या इस्रायलच्या ‘लोरी’ या कंटेनर जहाजावर रॉकेट हल्ला झाला होता. या हल्ल्यात इस्रायली जहाजाचे नुकसान झाले होते. होर्मुझच्या आखातात गस्त घालणार्‍या इराणी जहाजांनी हा हल्ला चढविल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला होता.

आठवड्याभरापूर्वी रेड सीच्या क्षेत्रात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या ‘साविझ’ जहाजावर हल्ला झाला. इस्रायलने इराणी जहाजावर हा हल्ला घडविल्याचा आरोप अमेरिकी वर्तमानपत्राने केला होता. या हल्ल्यावर इराणकडून प्रतिक्रिया येऊ शकते, असा दावाही अमेरिकी वर्तमानपत्राने केला होता. पण आता हायपेरियॉन रे जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायल इराणला उत्तर देणार नाही, असा दावा याच अमेरिकी वर्तमानपत्राने इस्रायली अधिकार्‍यांच्या हवाल्याने केला आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून इस्रायल आणि इराणमध्ये येथील सागरी क्षेत्रात अघोषित युद्ध सुरू होते. पण गेल्या दोन महिन्यांमधील घडामोडीनंतर या देशांमधील अघोषित युद्धाची तीव्र्रता वाढल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी दिला आहे. मंगळवारच्या हल्ल्यानंतर याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

leave a reply