लष्करातील ‘कॉम्बॅट व्हेईकल्स’ना ‘नाईट व्हिजन’ यंत्रणेने सक्षम करण्याच्या हालचाली

नवी दिल्ली – चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर (एलएसी) सुरू असलेल्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने दीर्घकालीन संघर्षासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत ‘इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल्स’चा वापर रात्रीच्या वेळीही करण्यासाठी या वाहनांना ‘नाईट व्हिजन’ यंत्रणेने सक्षम बनविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सध्या लष्कराकडून ‘बीएमपी-२/२ इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल्स’चा वापर करण्यात येत असून, लडाख सीमेवर ही वाहने तैनात करण्यात आली आहेत.

'नाईट व्हिजन'

पुढील काळात संघर्ष भडकल्यास रात्रीच्या वेळी मुकाबला करण्याच्या दृष्टीने लष्कराने स्वदेशी कंपन्यांकडून ‘बीएमपी-२/२के इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल्स’चे आधुनिकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी कंपन्यांकडून ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट'(ईओआय) मागवल्या आहेत. सध्या तैनात असलेल्या ‘बीएमपी-२/२के इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल्स’मध्ये ‘इमेज इंटेन्सीफायर टेक्नॉलॉजी’ असून रात्रीच्या अंधारात त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे रात्रीच्या काळात मोहिमा राबविण्यावर मर्यादा येत असल्याचा दावा लष्करी सूत्रांनी केला.

१९८५ साली ‘बीएमपी-२/२के इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल्स’चा भारतीय लष्करात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर ते भारतीय लष्कराचा महत्त्वपूर्ण भाग बनले असून, सध्या ८००हुन अधिक ‘बीएमपी-२/२के इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल्स’ कार्यरत आहेत. रात्रीच्या लढाईची क्षमता विकसित केल्यानंतर हे लढाऊ वाहन अधिक घातक होतील असे सांगण्यात येते. ‘सीमेच्या बाजूचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर ‘मशिन ऑपरेशन्स’साठी पात्र आहे. सध्याच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आपली क्षमता वाढवावी लागेल. वाहनांच्या क्षमतेत वाढ करण्यात आल्याचं कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करता येईल, असे लष्कराच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नव्या ‘बीएमपी-२/२के इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल्स’मध्ये ‘थर्ड जनरेशन थर्मल इमेजर बेस्ड गनर साईट’ व ‘ऑटोमॅटिक टार्गेट ट्रॅकर’ यासारख्या यंत्रणांचा समावेश असणार आहे. येत्या दोन वर्षात प्रगत यंत्रणासह ‘कॉम्बॅट व्हेईकल्स’ लष्करात दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी लष्कराने जून महिन्यात १५६ ‘बीएमपी-२/२के इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल्स’ची मागणी नोंदवली आहे. त्यासाठी एक हजार कोटींहुन अधिक निधीची तरतूद करण्यात आली असून ‘ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड’कडून त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

leave a reply