जगाने नव्या साथीसाठी तयार राहावे

- 'डब्ल्यूएचओ'च्या प्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली – ”कोरोनाव्हायरस ही शेवटची साथ नाही हे लक्षात घ्या. जगाला भविष्यात अशा भीषण साथींच्या आव्हानांसाठी तयार राहायला हवे”, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस घेब्रूस्यूएस यांनी दिला आहे.

आतापर्यंतच्या जागतिक इतिहासातून साथींचे रोग हे जीवनाचा भाग असल्याचा धडा मिळतो. त्यामुळे कोरोनाव्हायरस ही जगातील शेवटची महामारी नाही. जगाने पुढील महामारीसाठी तोंड देण्यासाठी आतापेक्षा जास्त तयारी करायला हवी, असे ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस म्हणाले.

डिसेंबर 2019 मध्ये चीनने पहिल्यांदा आपल्याकडे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याचे घोषित केले होते. सध्या जगात कोरोनाने बळी गेलेल्या रुग्णांची संख्या आठ लाख ८८ हजारांच्या पुढे गेली आहे, तसेच आतापर्यंत दोन कोटी ७१ हजाराहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. भारतात सध्या कोरोनाचे दर दिवशी सुमारे नव्वद हजार रुग्ण आढळत असताना ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांनी दिलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो.

जगभरातील देशांनी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेकडे आता जास्त लक्ष पुरवण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतरही अजूनही काही देशांनी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेकडे पुरेसे लक्ष पुरवलेले नाही. सर्व देशांना सार्वजनिक आरोग्य सुविधांकडे लक्ष पुरविण्याची नितांत आवश्यकता आहे, असे ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख म्हणाले.

दरम्यान, सोमवारी डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्या डॉ. मार्गरेट हॅरीस यांनी जगात क्लिनिकल चाचणीच्या ऍडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचलेली कोणतीही लस पन्नास टक्केही प्रभावी नसल्याचे म्हटले होते. तसेच २०२१ सालापर्यंत या साथीवरील लसीची आणि व्यापक लसीकरणाची कोणतीही आशा नाही, असे हॅरीस म्हणाल्या होत्या.

leave a reply