बहुपक्षीय आशियाखेरीज बहुपक्षीय जग शक्य नाही

- भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

स्टॉकहोम/लंडन – जागतिकीकरण हे आजच्या काळाचे वास्तव आहे त्यासाठी बहुपक्षीय जग आपण स्वीकारायला हवे. मात्र बहुपक्षीय जग हे बहुपक्षीय आशियाखेरीज शक्य नाही, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बजावले. आशिया खंडावर वर्चस्व गाजवून त्याद्वारे जगावरील आपला प्रभाव वाढवू पाहणाऱ्या चीनच्या विरोधात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी हा इशारा दिला आहे. युरोपिय महासंघ व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांच्या बैठकीत परराष्ट्रमंत्री जयशंकर बोलत होते.

बहुपक्षीय आशियाखेरीज बहुपक्षीय जग शक्य नाही - भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर‘ईयू इंडो-पॅसिफिक मिनिस्टेरियन फोरम’च्या (ईआयपीएमएफ) बैठकीत बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युरोपिय देश व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांमध्ये सातत्यपूर्ण संवादाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. जागतिक पातळीवरील समस्यांच्या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वाचा ठरतो, असा दावा जयशंकर यांनी केला. त्याचवेळी जागतिकीकरण हे आजच्या काळाचे वास्तव असून बहुपक्षीय जगाची संकल्पना स्वीकारल्यावाचून खऱ्या अर्थाने जागतिकीकरण साधले जाऊ शकत नाही. तर बहुपक्षीय आशिया खंडाखेरीज बहुपक्षीय जगाची संकल्पना प्रत्यक्षात उतरणार नाही, असा दावा जयशंकर यांनी केला.

‘ईआयपीएमएफ’च्या बैठकीसाठी चीनला आमंत्रित करण्यात आलेले नाही. चीनच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील विस्तारवादी कारवाया तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वर्चस्व गाजविण्यासाठी चीनचे सुरू असलेले प्रयत्न लक्षात घेता, या बैठकीत चीनला सहभागी करून घेण्यात आलेले नाही. किंबहुना चीनपासून संभवणारा धोका हा या बैठकीतील प्रमुख मुद्दा असल्याचे दिसत आहे. जागतिक पातळीवरीस समस्यांची तीव्रता वाढत असताना इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांबरोबर युरोपिय महासंघाचा संवाद अधिक महत्त्वाचा ठरतो, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले.

कोरोनाची साथ व त्यामुळे निर्माण झालेल्या पुरवठा साखळीशी संबंधित समस्यांचा दाखला यावेळी जयशंकर यांनी दिला. उत्पादन व अर्थकारण एकाच ठिकाणी केंद्रीत केल्यामुळे फार मोठा धोका पत्करावा लागतो. ही जोखीम टाळायची असेल तर उत्पादनासाठी अधिक विश्वासार्ह व चिवट अशी पुरवठा साखळी विकसित करणे भाग आहे, असे जयशंकर पुढे म्हणाले.

कोरोनाची साथ आल्यानंतर जगाची फॅक्टरी मानल्या जाणाऱ्या चीनमधील उत्पादन बाधित झाले होते. त्याचा जागतिक उत्पादनावर परिणाम झाला होता. चीनने आपले महत्त्व वाढवून जगाला वेठीस धरण्यासाठी जाणीवपूर्वक हे घडवून आणल्याचे आरोप झाले होते. त्या पार्श्वभूमीव, परराष्ट्रमंत्री जयशंकर विश्वासार्ह व संकटांना दाद न देणारी अशी मजबूत पुरवठा साखळी विकसित करण्याचे सुचवित असल्याचे दिसत आहे. भारत जागतिक उत्पादनाचे चीनपेक्षाही अधिक विश्वासार्ह केंद्र बनेल, असे संकेत याद्वारे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिले आहेत.

दरम्यान, या बैठकीत सहभागी झालेल्या फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रिया, बल्गेरिया, सायप्रस, लाटविया, लिथुआनिया, रोमानिया व स्वीडन या नऊ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी जयशंकर यांची द्विपक्षीय चर्चा पार पडल्याचे वृत्त आहे. युक्रेनचे युद्ध, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थितीबरोबरच आर्थिक सहकार्य हा या देशांबरोबरील चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सांगितले जाते.

हिंदी

 

leave a reply