इराणला रोखण्यासाठी अमेरिका आखाती क्षेत्रात बचावात्मक तैनाती करणार

- व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांची घोषणा

वॉशिंग्टन – अमेरिका आखाती क्षेत्रात संरक्षणासाठी आवश्यक तैनाती करणार असल्याची घोषणा व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी केली. एप्रिल महिन्याच्या अखेरीस व मे महिन्याच्या सुरूवातीला इराणने होर्मुझच्या आखातातून दोन इंधनवाहू जहाजे ताब्यात घेतली होती. तसेच होर्मुझचे आखात बंद करण्याच्या धमक्याही इराणने दिल्या होत्या. आपले इंधनवाहू जहाज इराणने ताब्यात घेतल्यानंतर, अमेरिकेने इराणच्या विरोधात हालचाली सुरू केल्या आहेत. किरबाय यांनी केलेली बचावात्मक तैनातीची घोषणा हा अमेरिकेच्या याच हालचालींचा भाग ठरतो.

इराणला रोखण्यासाठी अमेरिका आखाती क्षेत्रात बचावात्मक तैनाती करणार - व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांची घोषणाइराण होर्मुझच्या आखातात बेताल कारवाया करून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करीत आहे. ही बाब खपवून घेता येणार नाही. यासाठी अमेरिका आखाती क्षेत्रात बचावात्मक तैनाती करणार असल्याची घोषणा व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी केली. तसेच यासंदर्भात या क्षेत्रातील सहकारी देशांबरोबर अमेरिका काम करीत असल्याचे किरबाय यांनी म्हटले आहे. इराणच्या विरोधात सहकारी देशांचे सहाय्य घेण्याची घोषणा व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी केली असली, तरी आखाती क्षेत्रातील सहकारी देश अमेरिकेवर नाराज असल्याचे याआधीच उघड झाले होते.

याच कारणामुळे सौदी अरेबियाने चीनच्या मध्यस्थीने इराणशी चर्चा सुरू करून राजनैतिक संबंध नव्याने प्रस्थापित केले आहेत. सौदीच्या नेतृत्त्वाखाली इतर आखाती देश देखील इराणबरोबरील संबंध सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत. या यशानंतर इराणने अमेरिकेच्या विरोधातील कारवाया अधिकच तीव्र केल्याचे दिसते. इंधनाची वाहतूक करणारी जहाजे ताब्यात घेऊन इराण अमेरिकेला धडा शिकविण्याची तयारी करीत असल्याचे दावे केले जातात. याआधी आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात इंधनाची वाहतूक करणारी इराणची जहाजे अमेरिकेने ताब्यात घेऊन कारवाई केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराण देखील होर्मुझच्या आखातातील तणाव वाढविल्याचे दिसत आहे.

दरम्यान, होर्मुझच्या आखातात अधिक तणाव निर्माण झाला व इथली इंधनाची वाहतूक थांबली तर आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे दर प्रचंड प्रमाणात कडाडू शकतात. याचा फार मोठा फटका अमेरिकेलाही बसू शकतो. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनासमोर यामुळे नवे आव्हान उभे राहू शकते. सध्याच्या स्थितीत बायडेन प्रशासनाला ही बाब परडवणारी नाही. म्हणूनच अमेरिका आपल्या ‘बचावात्मक तैनाती’ करून इराणला खरमरीत संदेश देण्याच्या तयारीत आहे.

आपल्या नौदलाच्या जहाजांवर सुमारे दोन हजार किलोमीटर इतक्या अंतरापर्यंतचा मारा करू शकणारी क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आल्याची घोषणा इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केली. हे अमेरिकेच्या बचावात्मक तैनातीला इराणने दिलेले उत्तर असल्याचे संकेत मिळत आहेत.

हिंदी

 

leave a reply