मुंबईत एका दिवसात कोरोनाचे सात महिन्यातील सर्वाधिक रुग्ण आढळले

- ‘ओमिक्रॉन’च्या ३१ नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली/मुंबई – मुंबईत गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. रविवार संध्याकाळपर्यंतच्या चोवीस तासात महाराष्ट्रात १६४८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ९२२ जण हे मुंबईतच आढळले आहेत. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात तैनात असलेल्या व येथे उपस्थितीत ३२ पोलीस जवान व पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्याही सतत वाढत आहे. राज्यात रविवारी आणखी ३२ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली. यातील २७ रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत.

मुंबईत एका दिवसात कोरोनाचे सात महिन्यातील सर्वाधिक रुग्ण आढळले - ‘ओमिक्रॉन’च्या ३१ नव्या रुग्णांची नोंदकेंद्र सरकारने नुकतेच राज्यांना ओमिक्रॉनचा व्हेरिअंट व नव्या लाटेचा धोका पाहता पावले उचलण्याची सूचना दिली होती. नाईट कर्फ्यू लावण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर रात्रीची संचारबंदी किंवा जमावबंदी लावणार्‍या राज्यांची संख्या वाढत आहे. दिल्ली सरकारनेही रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. दिल्लीत गेल्या चार दिवसात कोरोना रुग्णांमध्ये वाढ नोंदविण्यात आली होती. तर महाराष्ट्रानंतर सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण दिल्लीत आढळले आहेत.

दिल्लीसह मुंबईतही वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची चिंता वाढविल्या आहेत. मुंबईत आठ दिसांपूर्वीपर्यंत सुमारे दोनशे नवे कोरोना रुग्ण दरदिवशी आढळत होते. तीच संख्या आता जवळजवळ हजारपर्यंत पोहोचली आहे. रविवारी संध्याकाळपर्यंतच्या चोवीस तासात मुंबईत ९२२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत दैनंदिन रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीने महापालिका व आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत वाढ केली आहे. राज्यातील इतरही काही भागात रुग्ण वाढत आहेत. अहमदनगरमधील एका शाळेत आतापर्यंत ५१ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यातील ४८ विद्यार्थी आहेत. ही निवासी शाळा असून एक शिक्षक कोरोना बाधित आढळल्यावर शाळेतील ४०० विद्यार्थ्यांसह सर्वांची चाचणी करण्यात आली होती.

दरम्यान, ओमिक्रानच्या रुग्णांची संख्या देशात सतत वाढत आहे. रविवारी ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ४५० च्या पुढे पोहोचली आहे. महाराष्ट्रात रविवारी आणखी ३१ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल आल्यावर स्पष्ट झाले. यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमिक्रॉन रुग्णांची संख्या १४१ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या नव्या रुग्णांपैकी २७ रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत आढळलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ७१ वर पोहोचली आहे. तर रविवारी ठाण्यात दोन आणि पुणे व आकोल्यात प्रत्येक एक ओमिक्रॉन रुग्ण आढळला. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ओमिक्रॉन रुग्णांपैकी ६१ जणांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.

शनिवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात प्रत्येकांनी वैयक्तिक पातळीवर मास्क लावणे, हात धुणे यासारख्या कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत. हेच कोरोना विरोधातील लढाईतील प्रथम शस्त्र असल्याचे आवाहन केले होते. तसेच १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याची व फ्रन्ट लाईन वर्कर्स आणि व्याधीग्रस्त जेष्ठ रुग्णांना बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचेही जाहीर केले होते. रविवारी पुन्हा मन की बात कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी कोरोना विरोधातील लढाईत प्रत्येक देशवासियांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले.

leave a reply