तालिबान पाकिस्तानी लष्कराला त्यांच्याच भाषेत उत्तर देईल

- तालिबानच्या वरिष्ठ कमांडरची धमकी

पाकिस्तानी लष्करकाबुल – ‘पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानवरील मॉर्टर्सचे हल्ले त्वरीत थांबवावे. अन्यथा पाकिस्तानी लष्कराला कळेल अशाच भाषेत तालिबान त्याला उत्तर देईल’, अशी धमकी तालिबानच्या वरिष्ठ कमांडरने दिली. पाकिस्तानी लष्कराने चढविलेल्या कुनार प्रांतातील हल्ल्यांमध्ये अफगाणी नागरिक जखमी झाल्यानंतर तालिबानची ही धमकी आली आहे. ही धमकी पोकळ नसून तालिबान पाकिस्तानच्या सीमेजवळ रॉकेट लॉंचर्स तैनात करीत असल्याच्या बातम्या येत आहेत.

तालिबानमधील ‘२०१ खालिद बिन वालिद कॉर्प्स’ या गटाचा कमांडर अबू दोजाना याने अफगाणी वृत्तवाहिनीशी बोलताना पाकिस्तानच्या लष्कराला धमकावले. ‘अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला आपल्या सर्व शेजारी देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. असे असले तरी अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेला शस्त्रसाठा देखील तालिबानकडे आहे’, असे अबू दोजाना म्हणाला.

‘अफगाणिस्तान हा अतिशय बहुमूल्य भूभाग आहे. यासाठी आम्ही मोठे बलिदान दिले. इतर देशांप्रमाणे अफगाणिस्तानला पाकिस्तानबरोबरही चांगले संबंध हवे आहेत. पण पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या हद्दीतील हल्ले रोखले नाहीत तर तालिबान देखील पाकिस्तानला कळते अशाच भाषेत उत्तर देईल’, असे दोजाना याने बजावले आहे.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतातील चोगाम भागात मॉर्टर्सचे भीषण हल्ले चढविले होते. यामध्ये एक अफगाणी नागरिक जखमी झाला होता. तसेच इथल्या घरांचे मोठे नुकसान झाले होते. या मॉर्टर हल्ल्यांबरोबरच पाकिस्तानचे ड्रोन देखील आपल्या गावांवरुन घिरट्या घालत असल्याची तक्रार अफगाणी नागरिक करीत आहेत. तालिबानने गोळीबार करून पाकिस्तानचे ड्रोन्स पिटाळून लावल्याचे दावे करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर, तालिबानच्या कमांडरने पाकिस्तानच्या लष्कराला धमकावल्याचे दिसत आहे.

अफगाण तालिबानबरोबर सुरू असलेला संघर्ष आणि तालिबानकडून दिल्या जाणार्‍या धमक्यांबाबत पाकिस्तानचे सरकार चकार शब्द उच्चारायला तयार नाही. ड्युरंड लाईनवरील या चकमकीच्या बातम्या प्रसारित केल्या जाऊ नयेत, यासाठी पाकिस्तानचे सरकार आपल्या माध्यमांवर दबाव टाकत आहे. मात्र अफगाणिस्तानच्या माध्यमांमध्ये ड्युरंड सीमेवरील संघर्षाबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून ड्युरंड सीमेवर अफगाण तालिबान आणि पाकिस्तानच्या लष्करात जोरदार संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानचे लष्कर नागरी वस्त्यांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप अफगाणी माध्यमे करीत आहेत. गेल्या आठवड्यात तालिबानने ड्युरंड सीमेवरील काटेरी तारेचे कुंपण उखडून आणि पाकिस्तानच्या चार जवानांना ठार केले होते. तालिबानला आत्तापर्यंत केलेल्या सहाय्याचे हे फळ मिळत असेल, तर पाकिस्तानचे सरकार आंतरराष्ट्रीय समुदायासमोर तालिबानची वकिली कशासाठी करीत आहे, असे प्रश्‍न पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते विचारू लागले आहेत. याला पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने उत्तर दिलेले नाही.

पुढच्या काळात तालिबान हे पाकिस्तानच्या सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान बनेल, अशी चिंता या देशातील पत्रकार व विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply