म्यानमारच्या लष्कराने ३५ जणांना जाळले

- बळींमध्ये मुले व महिलांचा समावेश

३५ जणांना जाळलेयांगून – म्यानमारच्या लष्कराने मोसो गावानजिक सुमारे ३५ जणांना जाळून मारल्याची भीषण घटना समोर आली आहे. म्यानमारच्या स्थानिक बंडखोर गटांनी याचे फोटोग्राफ्स व माहिती प्रसिद्ध केली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच म्यानमारच्या लष्कराने डोन ताऊ गावातील ११ जणांना घरातून बाहेर खेचून जिवंत पेटवून दिल्याची हादरवून टाकणारी घटना समोर आली होती. याचे व्हिडिओ व फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र पडसाद उमटले होते.

थायलंडच्या सीमेला लागून असलेल्या कयाह प्रांतात शुक्रवारी म्यानमारच्या लष्कराने ही अमानुष कारवाई केली. शुक्रवारी म्यानमार लष्कराची तुकडी ‘डेमोसो टाऊनशिप’मधून हप्रुसो भागाकडे प्रवास करीत होती. यावेळी लष्करी तुकडीची स्थानिक सशस्त्र बंडखोर गट व विस्थापित होणार्‍या गावकर्‍यांशी गाठ पडली. यावेळी झालेल्या संघर्षात बंडखोर गटाच्या चार सदस्यांचा बळी गेला. त्यानंतर काही काळाने या भागात धुराचे मोठे लोट दिसून आल्याचे बंडखोर गटाकडून सांगण्यात आले. लष्कराच्या भीतीने सुरुवातीला बंडखोर गट आग लागलेल्या भागाला भेट देऊ शकला नाही.

३५ जणांना जाळलेमात्र शनिवारी सकाळी भेट दिल्यानंतर आठ गाड्या व पाच बाईक्स पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत मिळाल्या. गाड्यांमध्ये अनेक जळलेले मृतदेहही आढळले असून त्यात एका मुलाचा व महिलांचाही समावेश असल्याचे बंडखोरांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत जवळपास ३५ जळलेले मृतदेह मिळाले असून इथे नक्की काय घडले याची कल्पना नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. या घटनेवर बंडखोर गट व स्थानिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून म्यानमारचे लष्कर क्र्रौर्याचा कळस गाठल्याची टीका करण्यात येत आहे.

म्यानमारच्या लष्कराने दाखविलेल्या क्र्रौर्याची अनेक उदाहरणे गेल्या काही महिन्यात समोर येत आहे. जुंटा राजवटीने म्यानमारचा ताबा घेतल्यापासून अशा घटना नियमितपणे घडत असल्याचे मानवाधिकार संघटनांकडून सांगण्यात येते. काही महिन्यांपूर्वी घरात आपल्या बसलेल्या लहान मुलीवर व तिच्या वडिलांवर जागीच गोळ्या झाडण्यात आल्याची घटनाही समोर आली होती. गेल्याच महिन्यात वायव्येकडील एका गावातील वस्त्या लष्कराने पेटवून दिल्या होत्या. तर त्याआधी जुंटा राजवटीविरोधात निदर्शन करणार्‍यांना आश्रय देणार्‍या गावांवर हवाई हल्ले चढविणे किंवा त्या घरांमधील तरुण-तरुणींना उचलून नेण्याच्या घटना समोर आल्या होत्या.

फेब्रुवारी महिन्यापासून जुंटा राजवटीने आपल्याविरोधातील निदर्शने चिरडण्यासाठी केलेल्या कारवाईत १,३०० हून अधिक जणांचा बळी गेला. तर दहा हजारांहून अधिक जणांना अटक झाली आहे.

leave a reply