चीनमध्ये होणार्‍या ‘विंटर ऑलिंपिक्स’वर जपानकडून राजनैतिक बहिष्कार घोषित

राजनैतिक बहिष्कारटोकिओ/बीजिंग – जपानने पुढील वर्षी चीनमध्ये होणार्‍या ‘विंटर ऑलिंपिक्स’वर राजनैतिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, जपानचे पंतप्रधान, मंत्री व राजनैतिक अधिकारी चीनमध्ये होणार्‍या स्पर्धांना उपस्थित राहणार नाहीत. जपान सरकारचे प्रमुख सचिव हिरोकाजु मात्सुुनो यांनी ही माहिती दिली. यापूर्वी अमेरिकेसह ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व लिथुआनिया या देशांनी चीनमधील ऑलिंपिक स्पर्थांवर राजनैतिक बहिष्काराची घोषणा केली होती.

चीनची राजधानी बीजिंगमध्ये पुढील वर्षी ‘विंटर ऑलिंपिक्स’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांवर आधीच कोरोनाच्या साथीचे सावट आहे. मात्र चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने स्पर्धांसाठी जय्यत व भव्यदिव्य तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या साथीसह हॉंगकॉंग, तैवान, साऊथ चायना सी व तिबेटमधील कारवाया यामुळे चीनची आंतरराष्ट्रीय प्रतिमा डागाळली आहे. त्याचवेळी झिंजिआंग प्रांतातील उघूरवंशियांच्या वंशसंहाराच्या आरोपांनी कम्युनिस्ट राजवट चांगलीच अडचणीत आली आहे. या पार्श्‍वभूमीवर स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला होणारा विरोध तसेच टीकेची धार कमी करून प्रतिमा सुधारण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

मात्र पाश्‍चात्य देशांनी उघूरवंशियांच्या वंशसंहाराच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली असून ऑलिंपिंकवर राजनैतिक बहिष्कार टाकण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, या महिन्याच्या सुरुवातील अमेरिका व सहकारी देशांनी राजनैतिक बहिष्काराची घोषणा केली होती. झिंजिआंगमधील वंशसंहार व मानवाधिकारांचे उल्लंघन या मुद्यांवरून बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे संबंधित देशांनी जाहीर केले होते.

राजनैतिक बहिष्कारकोरोनाची साथ सुरू असतानाच ऑलिंपिक स्पर्धांचे यशस्वी आयोजन करणारा जपान याबाबत काय भूमिका घेतो याकडे जगाचे लक्ष होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच स्थानिक पातळीवर विरोध होत असताना, चीनने जपानला स्पर्धा आयोजनासाठी समर्थन दिले होते. त्यामुळे बीजिंगमधील विंटर ऑलिंपिकलाही जपान विरोध करणार नाही, असे मानले जात होते. मात्र गेल्या काही वर्षात चीनबरोबरील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर जपानने बीजिंगमधील हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेवर राजनैतिक बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर चीनकडून प्रतिक्रिया उमटली असून, जपानने ऑलिंपिक चार्टरचे उल्लंघन करून खेळाचे राजकीयीकरण करण्याचा प्रयत्न करु नये, असे चीनच्या प्रवक्त्यांनी बजावले.

जपानचा शेजारी असणार्‍या दक्षिण कोरियाने मात्र चीनमधील ऑलिंपिक स्पर्धांवर बहिष्कार टाकणार नसल्याचे स्पष्ट केले. उलट या स्पर्धा चीनबरोबरील संबंध सुधारण्याची संधी असल्याचे दक्षिण कोरियाकडून सांगण्यात आले. युरोपातील आघाडीचा देश असणार्‍या फ्रान्सनेही बहिष्काराला विरोध केला असून चीनमध्ये राजनैतिक अधिकार्‍यांना धाडणार असल्याचे जाहीर केले आहे.

leave a reply