म्यानमारमध्ये बंडखोरांनी लष्कराचे हेलिकॉप्टर पाडले

- पार्सल बॉम्बस्फोटात पाच जणांचा बळी

यंगून – म्यानमारमध्ये लष्कर आणि लोकशाहीवादी समर्थकांच्या बाजूने लढणारे बंडखोर यांच्यात संघर्ष पेटला आहे. मंगळवारी म्यानमारच्या बागो प्रांतात झालेल्या पार्सल बॉम्बस्फोटात पाच जणांचा बळी गेला. यामध्ये स्यू की यांच्या पक्षाचे नेते आणि बंडखोर पोलीस जवानांचा समावेश होता. तर काही तासांपूर्वी म्यानमारच्या जुंटा राजवटीविरोधात संघर्ष करणार्‍या काचिन बंडखोर संघटनेने लष्कराचे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. गेल्या आठवड्यात बंडखोरांनी लष्कराचे दोन तळ उद्ध्वस्त केले होते.

म्यानमारमधील जुंटा राजवटीच्या विरोधात सुरू झालेले आंदोलन चौथ्या महिन्यात पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या आंदोलनाची दखल घ्यावी, यासाठी दोन दिवसांपूर्वी ‘शेक दी वर्ल्ड विथ स्प्रिंग रिव्होल्युशन’ छेडण्यात आले आहे. याबरोबर लोकशाहीवादी समर्थक पुन्हा एकदा म्यानमारच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने निदर्शने काढू लागले आहेत. ही निदर्शने दडपण्यासाठी म्यानमारच्या लष्कराने लोकशाहीवादी नेत्यांची धरपकड सुरू केली आहे. तसेच सोशल मीडियावर बंदी टाकली आहे. तसेच लष्कराने रस्ते आणि दुकानांच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा काढण्यासही सुरुवात केली आहे.

म्यानमारच्या लष्कराने रविवारी केलेल्या कारवाईत आठ निदर्शकांचा बळी गेला. म्यानमारच्या लष्कराने सुरू केलेल्या या कारवाईच्या विरोधात बंडखोरांनी संघर्ष पुकारला आहे. म्यानमारच्या लष्कराविरोधात संघर्षासाठी नव्याने स्थापना झालेल्या ‘चिनलँड डिफेन्स फोर्स’ या बंडखोर संघटनेने सोमवारी केलेल्या कारवाईत लष्कराच्या चार जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे. यासंबंधीची माहिती या बंडखोर संघटनेने सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे.

तर ‘काचिन इंडिपेंडन्स आर्मी’ या बंडखोर संघटनेने म्यानमारच्या काचिन प्रांतात मोमौक भागात लष्कराचे हेलिकॉप्टर पाडले. लष्कराने आपल्या ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, म्हणून प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हेलिकॉप्टर पाडल्याचे काचिन बंडखोरांनी म्हटले आहे. स्थानिक माध्यमांनी हेलिकॉप्टर पाडल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे या हल्ल्यात म्यानमारच्या लष्कराचे जवान मारले गेल्याची शक्यता वर्तविण्यात येते. पण लष्कराने याचे तपशील जाहीर केलेले नाहीत.

काचिन बंडखोरांची संघटना म्यानमारमधील सर्वात मोठी आणि शक्तीशाली मानली जाते. याआधीही काचिन बंडखोर आणि म्यानमारच्या लष्करामध्ये संघर्ष पेटला होता. तर काही दिवसांपूर्वी कारेन बंडखोरांनी म्यानमारच्या लष्कराच्या दोन तळांवर हल्ले चढवून ताबा घेतला होता.

दरम्यान, म्यानमारचे लष्कर आणि बंडखोरांमध्ये संघर्ष पेटलेला असताना, बागो प्रांतात एका गावात पार्सल बॉम्बस्फोट झाला. येथील एका घरामध्ये स्यू की यांच्या पक्षाचे नेते आणि लष्करातून बंडखोरी केलेले चार जवान यांनी आश्रय घेतला होता. मंगळवारी या घराला पार्सल बॉम्बने लक्ष्य केले गेले. या स्फोटात संबंधित नेत्यासह तीन जवान आणि एका नागरिकाचा बळी गेला. तर चौथा जवान गंभीररित्या जखमी झाला आहे. हा हल्ला कोणी घडविला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण म्यानमारमधील संघर्षात बॉम्बचा वापर होऊ लागल्याचे यामुळे समोर येत आहे. ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या ‘जी७’च्या बैठकीत म्यानमारमधील या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

leave a reply