उत्तराखंडच्या चंपावतमधील ‘नो मॅन्स लॅण्ड’वर नेपाळकडून दावा

काठमांडू – नेपाळने उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील सीमेलगतच्या भागांवर दावा ठोकून आणखी एक वाद उकरून काढला आहे . मात्र भारताविरोधात वातावरण तयार करण्यासाठी नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या या हालचालींविरोधात नेपाळचा मुख्य विरोधी पक्ष असेलेल्या नेपाळ काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. नेपाळ सरकारने नकाशा प्रसिद्ध करण्याची घाई केली आहे. कालापानी येथील सीमा वादाबाबत नेपाळी काँग्रेस सरकारबरोबर आहे. मात्र हा वाद राजनैतिक चर्चेद्वारे सोडविण्याचे प्रयत्न व्हायला हवे होते, असे नेपाळ काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे.

उत्तराखंडच्या चंपावतमधील 'नो मॅन्स लॅन्ड'वर नेपाळकडून दावा२२ जुलै रोजी टनकपुरच्या ब्रह्मदेव परिसरात नो मॅन्स लॅण्डमध्ये नेपाळी नागरिकांनी सीमा रेखांकित करणारे सीमेंटचे पिलर उखडून वृक्षारोपण केले होते. नेपाळी जनतेच्या या कृत्याचा भारताने विरोध केला होता. या घटनेनंतर इथे तणाव निर्माण झाला आहे. आता नेपाळच्या कंचनपूर जिल्ह्यातील भीमदत्त नगरपालिकेचे महापौर सुरेंद्र बिष्ट यांनी टनकपूरची जमिन नेपाळ सरकारची असल्याचा दावा केला आहे. सुरेंद्र बिष्ट नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

भारत जी जमिन ‘नो मॅन्स लॅण्ड’ म्हणत आहे ती जमिन नेपाळची आहे, असे बिष्ट यांचे म्हणणे आहे. म्हणूनच दोन्ही देशांनी या नो मॅन्स लॅण्ड चे पुन्हा सर्वेक्षण करण्याची गरज आहे. ज्यामुळे तणाव कमी होऊन संबंध सुधारतील असे भीमदत्त नगरपालिकेच्या महापौरांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत या जमिनीवरून दोन्ही देशांमध्ये कुठलाच वाद नव्हता. पण भीमदत्त नगरपालिकेच्या महापौरांनी या भागावर नेपाळी जनतेचा हक्क सांगून नवीन वाद उकरून काढला आहे.

leave a reply