कोरोनावरील ‘ऑक्सफर्ड लसी’च्या मानवी चाचण्यांना भारतात मंजुरी

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या लस संशोधनात आघाडी घेतलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची मानवी चाचणी भारतात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला ऑक्सफर्डच्या या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातली मानवी चाचणी करण्यास मंजुरी दिली आहे. ऑक्सफर्ड आणि सिरमने संयुक्तरित्या ही लस विकसित केली आहे.

कोरोनावरील 'ऑक्सफर्ड लसी'च्या मानवी चाचण्यांना भारतात मंजुरीऑक्सफर्ड लसीच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी चाचणीनंतर, त्याचे सकारात्मक परिणाम पहायला मिळाले. ही लस मानवी शरीरात कोरोनाव्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते. पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट जगभरात मोठ्या प्रमाणावर लस निर्मिती करते. ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर, भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी सिरमला परवानगी मिळावी यासाठी या इन्स्टिट्यूटने ‘डीसीजीआय’कडे याची परवानगी मागितली होती. अखेर ‘डीसीजीआय’ने त्याला परवानगी दिली असून लवकरच देशात मानवी चाचण्या सुरु होतील.

याआधी या लसीची चाचणी ब्रिटन आणि ब्राझीलमध्ये झाली होती. ब्रिटनमधल्या १०७७ जणांना या लसीचे डोस देण्यात आले होते. ५६ दिवसांच्या परीक्षणानंतर ही लस शरीरात अँटीबॉडी आणि टी-सेल्स करण्यास मदत करीत असल्याचे समोर आले होते. हे टी-सेल्स शरीरात कोरोनाव्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीनंतर त्याचे निष्कर्ष समोर येतील.

दरम्यान, सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांनी या लसीच्या शेवटच्या टप्पातील अहवाल समोर येण्याआधीच या लसीच्या कोट्यवधींच्या संख्येने उत्पादन घेण्यात येईल, असे जाहीर केले आहे. प्रत्येक मिनिटाला ५०० डोस तयार करण्यात येत असल्याचे पुनावाला यांनी म्हटले आहे.

leave a reply