नव्या शैक्षणिक धोरणामुळे भारत जागतिक ज्ञान-केंद्र बनेल

नवी दिल्ली – “देशाने स्वीकारलेले ‘नवे शैक्षणिक धोरण’ (एनईपी-2020) भारताला जागतिक ज्ञान-केंद्र बनविल. ‘आयआयटी’ची यात महत्त्वाची भूमिका असेल,” असा विश्वास केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला. देशातल्या आयआयटीज्‌ या केवळ शिकविणाऱ्या संस्था नाहीत. तर राष्ट्राच्या उभारणीत यांचा मोलाचा वाटा आहे’, असे शिक्षणमंत्री प्रधान पुढे म्हणाले. आयआयटी खरगपूरच्या एका व्हर्च्युअल कार्यक्रमात ते बोलत होते.

नव्या शैक्षणिक धोरणामुळे भारत जागतिक ज्ञान-केंद्र बनेलनुकतेच ‘एनईपी -2020’ ला वर्ष पूर्ण झाले. “नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणात सुलभता येईल, त्याचवेळी शिक्षणाचा दर्जा उंचावेल. ‘एनईपी’मुळे अनेक तरुण तांत्रिक शिक्षणाकडे वळतील. तसेच त्यांच्यामध्ये इंग्रजीचा अभाव निर्माण होणार नाही, असे शिक्षणमंत्री प्रधान यावेळी म्हणाले. तसेच देशातील काही इंजिनिअरिंग कॉलेज्‌ आता क्षेत्रिय भाषांमध्येही शिक्षण देत आहेत. इंग्लिशमध्ये शिकण्याची इच्छा नसलेल्या विद्यार्थ्यांना याचा फार मोठा लाभ मिळेल, असे सांगून प्रधान यांनी यावर समाधान व्यक्त केले.

अशा स्वरुपाचे अडथळे दूर झाल्याने कितीतरी पात्र विद्यार्थ्यांना कुठल्याही अडथळ्याखेरीज तांत्रिक शिक्षण घेता येईल, असा विश्वास शिक्षणमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘आयआयटी खरगपूर’च्या 71व्या वर्धापनदिनाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल सोहळ्यात शिक्षणमंत्र्यांनी ‘एनईपी’ आणि आयआयटीज्‌चे महत्त्व अधोरेखित केले. आयआयटी खरगपूर ही देशातली सर्वात जुनी शैक्षणिक संस्था आहे. पण काळानुसार या संस्थेने विद्यार्थ्यांना नवे तंत्रज्ञान आत्मसात करायला शिकविले आहे, असे शिक्षणमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 व्या शतकात ‘एनईपी’ महत्त्वाचे ठरेल असे सांगून यामुळे गरीबीविरोधात लढता येईल, असे म्हणाले. ‘एनईपी’मुळे मुलांच्या शिक्षणात भाषेचा अडसर येणार नाही, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला होता.

leave a reply