नवे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ ‘मार्कशीट’चा तणाव कमी करील

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास

नवी दिल्ली – ”देशात आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी ‘मार्कशीट’ म्हणजे तणाव शीट आणि पालकांसाठी प्रतिष्ठा शीट होती. पण देशाचे नवे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ (एनईपी) विद्यार्थ्यांचा मार्कशीटचा तणाव दूर करील”, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण'

‘स्कूल एज्युकेशन इन २० सेंच्युरी’ या विषयावर व्हर्च्युअल परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना ‘एनईपी’ चे महत्त्व पटवून दिले. २०२२ साली देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने देशभरात ‘एनईपी’ लागू होईल, याची घोषणा पंतप्रधानांनी केली. ‘ जुलै महिन्यात केंद्र सरकारने २१व्या शतकाला अनुसरून ३४ वर्षांपूर्वीचे शैक्षणिक धोरण बदलून नवे धोरण आणले. ‘एनईपी’ मुळे नव्या युगाचा आरंभ होईल आणि देशाच्या भवितव्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

गेल्या तीन दशकात देशातील प्रत्येक क्षेत्र आणि व्यवस्था बदलली. पण देशाची शिक्षण व्यवस्था मात्र जुनीच होती. या शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांना बांधून ठेवले होते. विज्ञान शाखेचा विद्यार्थी कला आणि वाणिज्य शाखेतील विषय शिकता येत नव्हते. पण आयुष्यात एकाच प्रकारचे साचेबद्ध शिक्षण उपयोगी पडत नाही. तर २१व्या शतकातील विद्यार्थ्यांना कौशल्य, कल्पकता, विचार, जिज्ञासा याच्या अनुभवाच्या जोरावरच टिकता येईल, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण'

नवे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापेक्षा मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करील. इथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देशभरातल्या शिक्षकांकडून ‘एनईपी’ संदर्भात सूचना मागितल्या होत्या. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून जवळपास लाखो शिक्षकांच्या सूचना आल्याचे सांगून पंतप्रधानांनी यावर समाधान व्यक्त केले. ‘एनईपी’मुळे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था भारतात ‘कँम्पस’उभारतील आणि त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. यामुळे ‘ब्रेन-ड्रेन’ थांबेल याकडे पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्ष वेधले होते.

leave a reply