नायजेरियाने डिजिटल चलन ‘ईनायरा’ सुरू केले

- नायजेरिया आफ्रिकेतील पहिला देश ठरला

‘ईनायरा’अबूजा – नायजेरिया हा डिजिटल चलन ‘ईनायरा’ सुरू करणारा आफ्रिकेतील पहिला देश ठरला. राष्ट्राध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांनी सोमवारी ‘ईनायरा’चा आरंभ केला. यामुळे नायजेरियाच्या बँकींग क्षेत्राची व्याप्ती वाढेल आणि अर्थव्यवस्थेत अब्जावधी डॉलर्सची वाढ होईल, असा दावा राष्ट्रध्यक्ष बुहारी यांनी केला. पुढच्या दहा वर्षात नायजेरियाचे सकल राष्ट्रीय उत्पादन २९ अब्ज डॉलर्सनी वाढेल, अशी अपेक्षा नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली.

‘आपल्या जनतेसाठी डिजिटल चलन बाजारात आणणारा नायजेरिया हा जगभरातील काही मोजक्या देशांपैकी एक ठरला आहे’, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष बुहारी यांनी केली. यावेळी सेंट्रल बँक ऑफ नायजेरियाचे गव्हर्नर गॉडविन एमिफिले उपस्थित होते. ईनायरा या डिजिटल चलनामुळे व्यवहार खर्चात कपात होईल आणि देशातील आर्थिक यंत्रणा मजबूत होईल, असा दावा एमिफिले यांनी केला.

नायजेरियातील ३३ बँका, दोन हजार ग्राहक आणि १२० व्यापारी आधीच ईनायरा या डिजिटल चलनाशी जोडलेले आहेत, असे एमिफिले यांनी जाहीर केले. फेब्रुवारी महिन्यात नायजेरियाच्या सेंट्रल बँकने क्रिप्टोकरन्सीज्च्या व्यवहारांवर बंदी टाकली होती. सदर चलन व्यवहार देशाच्या आर्थिक सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा दावा नायजेरियाने केला होता. काही दिवसांपूर्वी बहामास या कॅरेबियन देशाने डिजिटल चलन ‘सँड डॉलर’ बाजारात आणले होते.

leave a reply