जगातील कुठलीही शक्ती भारताचा एक इंच भूभागही बळकाऊ शकत नाही

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

लडाख – चीनबरोबरचा सीमावाद सोडवण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत या चर्चांमधून प्रश्न सुटायला हवा. पण या चर्चेला किती यश मिळेल, याची हमी मी देऊ शकत नाही. मात्र, जगातील कुठलीही शक्ती भारताचा एक इंच भूभागही बळकाऊ शकत नाही, हा विश्वास मी तुम्हाला नक्कीच देऊ शकतो, अशी घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या लडाख दौऱ्यात केली. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी लष्कर तसेच तीनही दलांचे स्पेशल फॉर्सेस आणि ‘इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस’शी (आयटीबीपी) चर्चा केली.

India-Landगलवान व्हॅलीतील संघर्ष आणि त्यानंतर लडाखमध्ये चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन आठवड्यांपूर्वी ३ जुलै रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग लडाखला भेट देणार होते. पण त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री शुक्रवारी लेह-लडाखमधील ‘लुकूंग पोस्ट’ आणि ‘स्टकना’ या भागाला भेट दिली. यावेळी स्टकना येथील भारतीय लष्कर आणि तीनही दलांच्या स्पेशल फॉर्सेसनी सादर केलेल्या सरावाची पाहणी केली. तर ‘पॅंगॉंग लेक’ जवळ असलेल्या लुकूंग पोस्ट येथे तैनात भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढविले. देशातील १३० कोटी जनता आपल्या सैनिकांच्या पराक्रमाचा अभिमान बाळगून असल्याचे, संरक्षणमंत्री यावेळी म्हणाले.

‘भारत असा एकमेव देश दिला आहे, ज्याने जगाला नेहमी शांतीचा संदेश दिला. भारताने कधीही कुठल्याही देशावर आक्रमण केले नाही किंवा कुठल्याही देशाचा भूभाग बळकावला नाही. भारत हा वसुधैव कुटुंबकम् यावर विश्वास ठेवणारा देश असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. ‘आपला देश हा शांतीप्रिय देश असून भारताला कुठल्याही देशाबरोबर अस्थैर्य नको तर शांती हवी आहे. दुसऱ्या देशाचा स्वाभिमान दुखावणे हा भारताचा स्वभाव नाही. मात्र भारताचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न झालाच, तर ते कदापि सहन केले जाणार नाही. भारताकडून जबरदस्त प्रत्युत्तर दिले जाईल. सीमेवर तैनात आपले सैनिक शत्रूच्या कुठल्याही आगळीकीला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहेत’, असे संरक्षणमंत्र्यांनी बजावले.

यानंतर संरक्षणमंत्र्यांनी या भागात तैनात भारतीय सैनिकांशी संवाद साधला. यावेळी संरक्षणदलप्रमुख जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हेदेखील उपस्थित होते. आपल्या या दौर्‍यात संरक्षणमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करून लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान आणि त्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी लडाखचा दौरा करुन चीनला संदेश दिल्याचा दावा केला जातो.

leave a reply