शत्रूदेश असलेला उत्तर कोरिया अनपेक्षितपणे हल्ले चढवू शकतो

दक्षिण कोरियाच्या ‘डिफेन्स रिपोर्ट’मधील इशारा

Launch attackसेऊल – ‘शत्रूदेश असणारा उत्तर कोरिया सातत्याने अण्वस्त्रांसह जैविक व रासायनिक शस्त्रे विकसित करीत आहे. या क्षमतांचा वापर सामरिक हल्ल्यांसाठी होऊ शकतो. उत्तर कोरियाकडे अनपेक्षितपणे दक्षिण कोरियावर हल्ला चढविण्याची सज्जता आहे’, असा इशारा दक्षिण कोरियाने दिला. गेल्याच आठवड्यात उत्तर कोरियाने आण्विक स्फोटके वाहून नेणाऱ्या लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे संचलन केले होते. उत्तर कोरियाच्या हुकूमशाही राजवटीतील हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे लष्करी सामर्थ्यप्रदर्शन ठरले होते. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने नव्या संरक्षण अहवालात उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याबाबत दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

enemy countryगुरुवारी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्या सरकारने पहिल्यांदाच ‘डिफेन्स रिपोर्ट’ सादर केला. या अहवालात उत्तर कोरियाचा उघडपणे शत्रू म्हणून केलेला उल्लेख महत्त्वाचा ठरतो. डिसेंबर महिन्यात उत्तर कोरियाच्या राजवटीने दक्षिण कोरियाचा उल्लेख शत्रूदेश म्हणून केला होता. त्याचा संदर्भ देऊन उत्तर कोरियाची राजवट व लष्कर हे आता दक्षिण कोरियाचे शत्रू आहेत, असे डिफेन्स रिपोर्टमध्ये बजावण्यात आले. अहवालात उत्तर कोरिया हा देशाच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचेही सांगण्यात आले आहे. रिपोर्टमध्ये उत्तर कोरियाच्या संरक्षणक्षमतेबद्दलही माहिती देण्यात आली आहे. उत्तर कोरियाकडे ४,३०० रणगाडे, २,५०० सशस्त्र वाहने, ८,८०० आर्टिलरी सिस्टिम्स आणि साडेपाच हजार ‘मल्टिपल रॉकेट लाँचर सिस्टिम्स’ असल्याचे यात नमूद केले आहे. उत्तर कोरियाकडे १५४ पौंड प्लुटोनिअम असल्याचे सांगून या देशाने छोट्या आकाराची अण्वस्त्रे तयार करण्यात प्र्रगती केली असल्याची जाणीवही करून देण्यात आली आहे. उत्तर कोरियाकडून विकसित करण्यात येणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या वाढत्या संख्येकडेही डिफेन्स रिपोर्टने लक्ष वेधले.

North Koreaउत्तर कोरिया थेट अमेरिकेपर्यंत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन या क्षेत्रातील तणाव वाढवीत आहे. उत्तर कोरियाच्या मागे चीनचे पाठबळ असल्याचे दावे केले जातात. चीन व उत्तर कोरियाच्या आक्रमकतेविरोधात भूमिका स्वीकारण्यासाठी जपान आणि दक्षिण कोरिया आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करीत आहेत. या दोन्ही देशांकडून वारंवार उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधण्यात येत असून दक्षिण कोरियाचा नवा ‘डिफेन्स रिपोर्ट’ही त्याचाच भाग दिसतो.

दरम्यान, अमेरिका व दक्षिण कोरियाच्या युद्धसरावावरून उत्तर कोरियाने नवा इशारा दिला आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियातील युद्धसराव म्हणजे आपल्यावरील हल्ल्याची पूर्वतयारी असल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला आहे. कोरियन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची तैनाती करण्यासाठी अमेरिका सबबी देत असून अमेरिकेच्या लष्करी हालचालींना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे उत्तर कोरियाने बजावले आहे.

अमेरिकेने दक्षिण कोरियातील आपल्या तैनातीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दक्षिण कोरियाचा दौरा करून याबाबत महत्त्वाची घोषणा केली होती. दक्षिण कोरियाला नाटोच्या सदस्य देशांच्या धर्तीवर सुरक्षा पुरविण्याची ग्वाही ऑस्टिन यांनी दिली. उत्तर कोरियाच्या अणुहल्ल्याचा धोका वाढलाच तर दक्षिण कोरियामध्ये थेट अमेरिका आपली अण्वस्त्रेही तैनात करील, असे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले होते.

leave a reply