सोरस यांच्या आरोपांना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे खरमरीत प्रत्युत्तर

सोरस

नवी दिल्ली – जॉर्ज सोरस वृद्ध, धनाढ्य, हट्टाग्रही आणि खतरनाक आहेत. ते केवळ वृद्ध, धनाढ्य आणि हट्टाग्रही असते, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आले असते. पण न्यूयॉर्कमध्ये बसून जग आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीने चालविण्यासाठी सोरस आपल्याकडील स्त्रोतांचा वापर करीत आहेत. ही बाब घातक ठरते आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सोरस यांना भारत लोकशाहीवादी देश आहे, हे मान्य आहे. पण या लोकशाहीवादी देशाचे लोकनियुक्त नेतृत्त्व मान्य नाही. याचा अर्थ लोकशाहीत होणाऱ्या निवडणुकीतून आपल्याला हवे असलेले निकाल मिळाले, तरच ती लोकशाही ठरते, अन्यथा ती लोकशाहीच नाही, असा दावा सोरस करीत आहेत. या दाव्यामागे युरोप-अमेरिकेची वर्चस्ववादी मानसिकता आहे, अशी खरमरीत टीका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली.

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना जॉर्ज सोरस यांनी भारताबाबत केलेल्या विधानांवर प्रश्न विचारण्यात आला होता. भारताच्या लोकशाही व नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित करून सोरस यांनी भारतात नेतृत्त्वबदल घडविण्याबाबत आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर विधाने केली होती. त्याचा दाखला देऊन जॉर्ज सोरस खतरनाक असल्याचा दावा परराष्ट्रमंत्र्यांनी केला. पाश्चिमात्य देश दुसऱ्या देशांमध्ये सत्ताबदलासाठी कारस्थाने करीत आल्याचे आम्ही ऐकलेले आहे. तोच प्रकार लोकशाही वाचविण्याच्या नावाखाली जॉर्ज सोरस भारतात करू पाहत आहेत. त्यासाठी आपल्याकडील साधनसंपत्ती व आपल्या संस्थांचा वापर सोरस करीत आहेत, ही घातक बाब ठरते. कारण 140 कोटी जनसंख्या असलेल्या देशाने आपला नेता म्हणून कुणाची निवड करायची, ते सोरस ठरवू पाहत आहेत, अशा घणाघाती शब्दात जयशंकर यांनी सोरस यांच्या तथाकथित उदारमतवादावर हल्ला चढविला.

सोरसयाआधी सोरस यांनी भारत आपल्या देशातील लाखो इस्लामधर्मियांचे नागरिकत्त्व काढून घेण्याच्या तयारीत असल्याचे खोटे आरोप केले होते. तसे झाले नाही व सोरस यांचा अपप्रचार कालांतराने उघड झाला. पण अशा अपप्रचारामुळे भारतात तेढ वाढण्याचा धोका संभवतो, याची जाणीव भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली. याद्वारे सोरस यांच्या विश्वासार्हतेवरच परराष्ट्रमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केले असून सोरस यांच्या भारताविरोधातील कपटकारस्थानावर नेमके बोट ठेवले.

दरम्यान, सोरस यांनी भारताच्या विरोधात केलेल्या विधानांवर देशभरातून जहाल प्रतिक्रिया येऊ लागल्या असून सोशल मीडियावर सोरस यांच्या वादग्रस्त इतिहासाची उजळणी केली जात आहे. 90च्या दशकात बँक ऑफ इंग्लंडचा घात करून सोरस यांनी अब्जावधी डॉलर्सची कमाई केली होती. तसेच थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, जपान व रशिया या देशांच्या अर्थव्यवस्थांची दैना उडविल्याचा आरोप सोरस यांच्यावर झाला होता. त्याला उत्तर देताना माझ्या आर्थिक व्यवहारांचे सामाजिक परिणाम काय होतात, याची पर्वा करण्याची मला गरज वाटत नाही, असे उत्तर सोरस यांनी दिले होते. या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जगाला उदारमतवाद आणि लोकशाहीचे धडे देणारे जॉर्ज सोरस या मुलाखतीत ‘मी पैसे कमवणारा उद्योजक असून पैसे कमावणे हेच माझे ध्येय आहे’ असे उघडपणे कबुल करताना दिसतात. याचा दाखला देऊन सोरस यांच्यावर भारतीयांनी कडाडून टीका केली आहे.

रशियन माध्यमांनीही सोरस यांना लोकशाही नाही, तर आधीची जागतिक व्यवस्था वाचवायची आहे आणि त्यासाठी ते धडपडत असल्याचा ठपका ठेवला आहे.

leave a reply