उत्तर कोरियाने ‘यलो सी’मध्ये चार क्षेपणास्त्रे डागली

अमेरिकेने बॉम्बर तर दक्षिण कोरियाने लढाऊ विमाने रवाना केली

korea missilesसेऊल – अमेरिका व दक्षिण कोरियाने युद्धसरावाची मुदत वाढविल्यामुळे खवळलेल्या उत्तर कोरियाने शनिवारी चार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केले. उत्तर कोरियाच्या पश्चिमेकडील ‘यलो सी’च्या क्षेत्रात ही क्षेपणास्त्रे कोसळली. तर गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाच्या इशाऱ्यांना त्याच शब्दात उत्तर देणाऱ्या दक्षिण कोरियाने पुन्हा एकदा आपली लढाऊ विमाने रवाना केली. तर या क्षेत्रात हवाईसराव करणाऱ्या अमेरिकेने ‘बी-1बी’ सुपरसोनिक बॉम्बर धाडून उत्तर कोरियाला बजावले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असलेले कोरियन क्षेत्र अण्वस्त्रमुक्त करण्यामध्ये सर्वांचेच भले आहे, याची आठवण भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीतून करून दिली आहे.

us stealth bomberशनिवारी सकाळी उत्तर कोरियाने यलो सीच्या दिशेने लघु पल्ल्याची चार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. गेल्या आठवड्याभरात उत्तर कोरियाने एकूण 30 क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. यामध्ये जपानच्या सागरी क्षेत्रात कोसळलेल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा देखील समावेश होता. गेल्या कित्येक दशकांच्या इतिहासात उत्तर कोरियाने एवढ्या मोठ्या संख्येने क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. किम जाँग-उन यांचे वडिल व माजी हुकूमशहा किम जाँग-ईल यांच्या कार्यकाळात देखील एवढ्या संख्येने क्षेपणास्त्रांची चाचणी झाली नव्हती, याकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

korea missile statsअमेरिका व दक्षिण कोरियाने सुरू केलेल्या व्हिजिलंट स्टॉर्म हा हवाई युद्धसरावाच्या विरोधात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याचा सपाटा लावला आहे. तर अमेरिका व दक्षिण कोरियाने देखील या युद्धसरावाची मुदत वाढवून उत्तर कोरियाला चिथावणी दिली आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांना दक्षिण कोरियाकडून क्षेपणास्त्र प्रक्षेपण करून उत्तर दिले जात आहे. तर उत्तर कोरियाने 180 लढाऊ विमाने रवाना केल्यानंतर दक्षिण कोरियाच्या अतिप्रगत लढाऊ विमानांनी उड्डाण केले होते. शनिवारी देखील दक्षिण कोरियाच्या लढाऊ तर अमेरिकेच्या ‘बी-1बी’ या सुपरसोनिक प्रगत बॉम्बर विमानाने उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांना उत्तर दिले.

अमेरिकेच्या गुआम बेटावर तैनात असलेल्या ‘बी-1बी’ बॉम्बर विमानाने उड्डाण करून उत्तर कोरियाला इशारा दिल्याचा दावा केला जात. ‘बी-1बी’ हे आण्विक स्फोटके वाहून नेणारे बॉम्बर विमान आहे. पूर्व आशियात तणाव निर्माण झालाच तर अवघ्या काही मिनिटांमध्ये आपली बॉम्बर विमाने मित्र व सहकारी देशांच्या सुरक्षेसाठी दाखल होतील, असा इशारा अमेरिकेने या बॉम्बर विमानाच्या उड्डाणातून दिल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत.

दरम्यान, आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेणाऱ्या उत्तर कोरियाविरोधात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत ठराव आणण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केले होते. पण रशिया व चीनने अमेरिकेचे हे प्रयत्न हाणून पाडले. अमेरिकेने दक्षिण कोरियाबरोबर सुरू केलेला आणि पुढे मुदत वाढविलेल्या युद्धसरावामुळे चिथावणी मिळालेला उत्तर कोरिया क्षेपणास्त्रांची चाचणी घेत असल्याचा पलटवार रशिया व चीनने केला आहे.

leave a reply