पाकिस्तानी लष्कराकडून इम्रान खान यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी

इस्लामाबाद – माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्यावरील हल्ल्याबातत केलेले आरोप निराधार आणि बेजबाबदार असल्याचे सांगून पाकिस्तानच्या लष्कराने हे आरोप धुडकावले आहे. त्याचवेळी इम्रान खान यांच्या जाहीर भाषणांवर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानच्या यंत्रणांनी घेतल्याचे वृत्त आहे. तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याची न्यायालयीन समिती नेमून चौकशी करण्याची घोषणा केली. त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर व सरकार मिळून इम्रान खान यांच्या मुसक्या आवळण्याची जोरदार तयारी करीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Imran-Khanगुरूवारी इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले असून खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानात पेटवून देण्याची भाषा सुरू केली आहे. तर काही वरिष्ठ पत्रकार इम्रान खान यांच्यावरील हल्ला म्हणजे ‘वॉर्निंग शॉट्स’ होते की ‘बुस्टर शॉट्‌‍स’, असा सवाल करीत आहेत. यापुढे पाकिस्तानचे लष्कर व आयएसआयवर टीका कराल तर धडगत नाही, या इशारा देण्यासाठी इम्रान खान यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता वॉर्निंग शॉट्सच्या तर्कामागे आहे. हा हल्ला पंजाब प्रांतात झाला आणि इथे इम्रान खान यांच्याच पक्षाचे सरकार आहे. तरीही इथल्या पोलीस दलाने इम्रान खान यांना सुरक्षा पुरविली नसेल, तर ती विचार करण्यास भाग पाडणारी बाब ठरते, असे सांगून हे पत्रकार ‘बुस्टर शॉट्स’ची शक्यता वर्तवत आहेत. पाकिस्तानी जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठीच इम्रान खान यांनी हा सारा बनाव घडवून आणला असावा, असा तर्क त्यामागे आहे.

अशारितीने पाकिस्तानातील काहीजण इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याबाबत संशय व्यक्त करीत असतानाच, पाकिस्तानी लष्कराच्या ‘इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स-आयएसपीआर’ने इम्रान खान यांनी केलेले आरोप धुडकावले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, अंतर्गत सुरक्षा मंत्री राणा सनाउल्लाह आणि आयएसआयचे अधिकारी मेजर जनरल फैझल नसिर या तिघांनी मिळून आपल्यावरील हल्ल्याचे कारस्थान आखल्याचा ठपका इम्रान खान यांनी ठेवला होता. पण हे आरोप निराधार व बेजबाबदारपणे केलेले असल्याची टीका आयएसपीआरने केली. तसेच पुढच्या काळात असे आरोप करून व पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेची बदनामी करून कुणीही निसटणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असा सज्जड इशारा आयएसपीआरने दिला आहे.

याचा अर्थ पाकिस्तानच्या लष्कराने इम्रान खान यांना न्यायालयात खेचण्याची तयारी केली आहे असा होतो, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी न्यायालयीन समिती नेमून इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याचे सत्य पाकिस्तानच्या जनतेसमोर आणण्याची घोषणा केली. खान यांच्यावरील या हल्ल्याच्या मुद्यावर पाकिस्तानचे सरकार व लष्कर यांची भूमिका एकसमान असल्याचा दावा माहिती मंत्री मरियम औरंगझेब यांनी केला. तर पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी इम्रान खान पाकिस्तानात अराजक माजविण्यासाठी साऱ्या मर्यादा ओलांडत असल्याचा आरोप केला. इम्रान खान देशाची सुरक्षा करणाऱ्या यंत्रणांविरोधात गरळ ओकत असल्याचा ठपका झरदारी यांनी ठेवला.

खान यांच्यावर ही टीका होत असतानाच, ‘पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया अँड रेग्युलेटरी अथॉरिटी-पीईएमआरए’ने इम्रान खान यांच्या भाषणांच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. या निर्णयामागे पाकिस्तानचे लष्कर असल्याचा दावा केला जातो व या निर्णयामुळे इम्रान खान यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी झाल्याचीही चर्चा सुरू आहे.

पाकिस्तानचे लष्कर व सरकार तसेच माध्यमांमधील गट अशारितीने इम्रान खान यांना लक्ष्य करीत असताना, एक मोठा वर्ग इम्रान खान यांच्या बाजूने उभा राहिला आहे. याचा फटका पाकिस्तानच्या लष्कराला बसला असून लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या रावळपिंडी येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने सुरू झाली आहेत. तसेच पेशावर येथील लष्कराच्या मुख्यालयासमोरही खान यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबादी केली. पाकिस्तानच्या इतर काही शहरांमध्येही निदर्शकांनी धुडगूस घातल्याचे व्हिडिओज्‌‍ समोर आले आहेत. यामुळे पाकिस्तानात दुफळी माजली असून आपला देश भयंकर अराजकाच्या गर्तेत ढकलला जात असल्याची भीती या देशातील विश्लेषक व सुबुद्ध पत्रकार व्यक्त करीत आहेत.

leave a reply