दक्षिण कोरियाने खुळचट स्वप्ने पाहू नये

- उत्तर कोरियाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्यांनी फटकारले

खुळचट स्वप्नेसेऊल – उत्तर कोरियाने अणुकार्यक्रम रोखला तर आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव दक्षिण कोरियाने दिला होता. पण उत्तर कोरियाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्या आणि हुकूमशहा किम जाँग-उन यांची बहीण किम यो जाँग यांनी दक्षिण कोरियाचा हा प्रस्ताव फेटाळला. तसेच दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी तोंड बंद करावे आणि खुळचट स्वप्ने पाहू नये, असे किम यो यांनी फटकारले. यामुळे उत्तर कोरियाने वाटाघाटींसाठी अजिबात तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी उत्तर कोरियाला नवा प्रस्ताव दिला होता. यामध्ये उत्तर कोरियाला मोठ्या प्रमाणात अन्नधान्य पुरविण्याचा समावेश होता. तसेच उत्तर कोरियासाठी प्रगत ऊर्जा प्रकल्प उभारून वितरणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच व्यापारासाठी किनारपट्टीवरील बंदर व प्रवासी विमानतळाचे अत्याधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला होता. याशिवाय वैद्यकीय सुविधा आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक व सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे राष्ट्राध्यक्ष येओल यांनी सुचविले होते.

खुळचट स्वप्नेया प्रस्तावाच्या मोबदल्यात उत्तर कोरियाने अणुकार्यक्रम बंद करावा, अशी मागणी दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केली होती. आपल्या आक्रमक धोरणांसाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्राध्यक्ष येओल यांच्या या प्रस्तावाचे स्वागत झाले होते. दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांचा सदर प्रस्ताव कोरियन क्षेत्राला अण्वस्त्रांपासून मुक्त करू शकतो, असा दावा पाश्चिमात्य माध्यमांनी केला होता. पण उत्तर कोरियाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्या किम यो जाँग यांनी अतिशय विखारी शब्दात दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांवर ताशेरे ओढले.

‘उत्तर कोरियाने स्वत:चा सन्मान आणि अणुबॉम्बच्या मोबदल्यात आर्थिक सहाय्य स्वीकारावे, असे सुचवून राष्ट्राध्यक्ष येओलना त्यांचा बालिशपणा दाखवून दिला आहे. छोट्याशा केकच्या तुकड्यासाठी कुणीही स्वत:चे नशीब दुसऱ्याच्या हवाली करीत नाही. तेव्हा दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी असे सल्ले देण्यापेक्षा आपले तोंड बंद केले तर ते त्यांच्यासाठी उत्तम असेल’, अशी निर्भत्सना किम यो यांनी केली. तसेच दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष येओल यांचा प्रस्ताव उभय देशांमधील संघर्षाला आमंत्रण देणारा ठरू शकतो, असा इशारा किम यो यांनी दिला.

दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष ली म्यूंग-बाक यांनी उत्तर कोरियाला दिलेल्या प्रस्तावाखेरीज राष्ट्राध्यक्ष येओल यांच्या प्रस्तावात नवे असे काहीच नसल्याचा दावा उत्तर कोरियाने केला. आठ वर्षांपूर्वीच उत्तर कोरियाने हा प्रस्ताव केराच्या टोपलीत टाकला होता, याची आठवण किम यो यांनी करून दिली. राष्ट्राध्यक्ष येओल यांच्या प्रस्तावावर उत्तर कोरियाने दिलेली प्रतिक्रिया अतिशय खेदजनक असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. तसेच किम यो यांनी आमच्या राष्ट्राध्यक्षांबाबत अतिशय आक्षेपार्ह आणि अर्वाच्च भाषेचा वापर केल्याची टीका दक्षिण कोरियाने केली.

दरम्यान, येत्या काही दिवसात अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करात युद्धसराव सुरू होत आहे. याचा निषेध करण्यासाठी उत्तर कोरियाने काही दिवसांपूर्वी क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. तसेच उत्तर कोरिया अणुचाचणीच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहे.

leave a reply