इराणच्या नव्या प्रस्तावानंतर अमेरिकेबरोबरचा अणुकरार संकटात

-अमेरिकी माध्यमांचा दावा

वॉशिंग्टन/तेहरान – अमेरिकेने इराणला अणुकरारावर दिलेल्या प्रस्तावावर इराणने त्यावर आपला प्रस्ताव अमेरिका व युरोपिय देशांना दिला आहे. याचे तपशील उघड झालेले नसले, तरी अणुकरारासाठी इराणने दिलेला हा प्र्रस्ताव अजिबात उत्साहवर्धक नाही, असे अमेरिका व युरोपिय देशांचे म्हणणे असल्याचे दावे केले जातात. अमेरिकन माध्यमांनी बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली.

Biden Khameneiगेल्या महिन्यात अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींची व्हिएन्ना येथे तातडीची अप्रत्यक्ष बैठक पार पडली होती. युरोपिय महासंघाच्या मध्यस्थीने पार पडलेल्या या बैठकीनंतर अमेरिका व इराणला अणुकराराबाबत आपला निर्णय कळविण्याची सूचना महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी केली होती. पण अमेरिका व इराणने कुठल्याही प्रकारच्या नव्या मागण्या समोर ठेवू नये, असे बोरेल यांनी बजावले होते. यानंतर अमेरिका व इराण यांच्यातील अणुकरार अंतिम टप्प्यात पोहोचल्याची चर्चा सुरू झाली होती. अमेरिकी माध्यमांनी तर अणुकरार अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्याचा दावा केला होता.

अशा परिस्थितीत, दोन दिवसांपूर्वी इराणने महासंघाकडे अणुकरारासाठी आपला प्रस्ताव सुपूर्द केला. 2015 सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासंदर्भात इराणने दिलेला हा प्रस्ताव प्रसिद्ध झालेला नाही. पण अमेरिका तसेच युरोपिय महासंघ इराणच्या या प्रस्तावानर नाराज असल्याचा दावा अमेरिकी वृत्तसंस्थेने बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने केला. इराणचा प्रस्ताव अणुकरार मागे खेचणारा असल्याची टीका अमेरिकी अधिकाऱ्याने केली. तर युरोपिय महासंघातील अधिकारी देखील इराणचा प्रस्ताव नकारात्मक असल्याची प्रतिक्रिया देत असल्याचे अमेरिकी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

अमेरिका इराणबरोबर करीत असलेला हा अणुकरार अतिशय ‘वाईट’ असल्याची प्रतिक्रिया इस्रायलच्या पंतप्रधानांनी याआधीच दिली होती. सौदी अरेबिया व सौदीच्या नेतृत्त्वाखाली इतर आखाती देश देखील या अणुकराराच्या विरोधात खडे ठाकले आहेत. अशा परिस्थितीत अणुकरारासाठी इराणला अधिक सवलती देणे बायडेन प्रशासनाला परवडणारे नाही. त्यातच अमेरिकेचे विरोधी पक्षनेते बायडेन प्रशासन इराणसमोर झुकत असल्याची टीका करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला इराण अणुकरारासाठी उत्सुक असलेल्या बायडेन प्रशासनासमोर नव्या शर्ती व अटी लादत असल्याचे दिसत आहे.

युक्रेनच्या युद्धामुळे कडाडलेले इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बायडेन प्रशासनाला इराणबरोबर लवकरात लवकरत अणुकरार करायचा असल्याचे दिसते. मात्र बायडेन प्रशासन घाईत असताना, इराण शांतपणे आपल्या मागण्या मान्य करून घेऊन मगच अणुकरारासाठी पाऊल उचारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे बायडेन प्रशासनाची कोंडी झाली असून अणुकरारासाठी मध्यस्थी करणारे युरोपिय देश देखील अडचणीत सापडले आहेत. अणुकरारावरील हे मतभेद वाटाघाटीत ताठरपणा दाखविण्यापुरते मर्यादित आहेत की खरोखरच यामुळे अणुकरार धोक्यात आलेला आहे, ते येत्या काही दिवसातच उघड होईल. मात्र हा अणुकरार झाला अथवा त्यावरील वाटाघाटी फिस्कटल्या तरी संपूर्ण आखाती क्षेत्रात त्याचे फार मोठे पडसाद उमटल्यावाचून राहणार नाही, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

leave a reply