भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आठ लाखांवर

महाराष्ट्रात चोवीस तासात ७,८६२ नवे रुग्ण

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आठ लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच या साथीने दागवलेल्यांची संख्या २२ हजारांवर पोहोचली आहे. केवळ चार दिवसात देशात एक लाख नवे रुग्ण सापडले आहेत. देशभरात विविध राज्यात चोवीस तासात नवे रुग्ण सापडण्याचा उच्चांक नोंदविला जात आहे. गुरुवार ते शुक्रवारच्या सकाळपर्यंत देशात २६,५०६ नवे रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी महाराष्ट्रात ७,८६२ नव्या रुग्णांची नोंद झाली.

Corona-Indiaदेशात कोरोनाच्या आतापर्यंत घेण्यात चाचण्यांची संख्या १ कोटी १० लाखांच्या वर गेली आहे. दरदिवशी घेण्यात येणाऱ्या चाचण्यांची संख्या अडीच लाखांच्या पुढे पोहोचली असताना दिवसाला २५ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. यामुळे चार दिवसातच देशात सुमारे एक लाख नव्या रुग्णांची नोंद झाली असून देशातील कोरोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८ लाख १० हजारांच्या पुढे गेल्याचे विविध राज्यांनी जाहीर केलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

महाराष्ट्रात चोवीस तासात २२६ जणांचा बळी गेला आणि ७,८६२ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील या साथीच्या एकूण बळींची संख्या ९,८१३ वर पोहोचली आहे. तसेच रुग्णांची संख्या २ लाख ३८ हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईत कोरोनाने आतापर्यंत ५ हजार ४६ मृत्यू झाले आहेत. मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे.

तामिळनाडूत चोवीस तासात ६४ जण दगावले आणि ३,७५६ नवे रुग्ण आढळले. दिल्लीत दिवसभरात २०८९ नव्या रुग्णांची नोंद झाली. कर्नाटकात २२२८ नवे रुग्ण सापडले. पश्चिम बंगालमध्ये ११९८ नव्या रुग्णांची नोंद झाली.

leave a reply