भारताच्या संरक्षणमंत्र्यांची अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर चर्चा

नवी दिल्ली – चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी अमेरिका तसेच दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर चर्चा केली. अमेरिका व दक्षिण कोरिया हे दोन्ही भारताला संरक्षण साहित्याचा पुरवठा करणारे आघाडीचे देश म्हणून ओळखले जातात. भारताने गेल्या काही दिवसात चीन सीमेवरील संरक्षणसिद्धता वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांबरोबरील चर्चा महत्वाची ठरते.

चर्चा

गेल्या महिन्यात गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराने चीनला जबरदस्त दणका दिला होता. या दणक्यानंतर भारताने चीन विरोधातील आपले धोरण अधिक आक्रमक केले असून चीन सीमेवर संरक्षण तैनाती वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी संरक्षणक्षेत्रातील प्रमुख भागीदार असणाऱ्या देशांबरोबर भारत सातत्याने संपर्कात आहे. गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर भारताने अमेरिका, रशिया, इस्रायल व फ्रान्स यांच्याबरोबर संवाद साधून संरक्षणसाहित्याचा पुरवठा वेगाने करण्याचे आवाहन केले होते. या सर्व देशांनी भारताला सकारात्मक प्रतिसादही दिला होता.

शुक्रवारी अमेरिका तसेच दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर झालेली चर्चा याच धोरणाचा भाग मानला जातो. गलवान व्हॅली संघर्षानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर व भारतीय संरक्षणमंत्र्यांमध्ये चर्चा होण्याची दुसरी वेळ आहे. भारत-चीन संघर्षात अमेरीकेने उघडपणे भारताची बाजू घेतली असून भारताने केलेल्या कारवाईची प्रशंसाही केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच नेत्यांनी, चीनविरोधातील संघर्षासाठी अमेरिका भारताला भक्कम समर्थन देईल अशी ग्वाहीदेखील दिली आहे. शुक्रवारी दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये टेलिफोन वरून झालेल्या संभाषणातही हाच मुद्दा अधोरेखित झाल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली. भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबतही बोलणी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

चर्चा

या संभाषणाच्या पार्श्वभूमीवरच अमेरिकी कंपनी बोईंगने, भारताबरोबरील करारानुसार ३७ लष्करी हेलिकॉप्टर्स भारतीय संरक्षण दलांना दिल्याची घोषणा केली आहे. या हेलिकॉप्टर्समध्ये २२ ‘अपाचे अटॅक हेलिकॉप्टर्स’ व १५ ‘चिनुक हेलिकॉप्टर्स’चा समावेश आहे. २०१५ साली यासंदर्भात संरक्षण करार झाला होता. त्यानंतर भारताने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सहा अतिरिक्त ‘अपाचे अटॅक हेलिकॉप्टर्स’साठी नवा करार केल्याचेही सांगण्यात येते. अमेरिकेने पुरविलेली ही सर्व प्रगत हेलिकॉप्टर्स चीन सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर तैनात करण्यात आल्याची माहिती संरक्षण दलातील सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री ‘जेओंग क्येओंग-दू’ यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य व इतर मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भारताने गेल्या वर्षी दक्षिण कोरियाबरोबर संयुक्तरित्या ‘लँड अँड नेव्हल सिस्टिम्स’ विकसित करण्याबाबत करार केला होता. चीन बरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेला वेग मिळावा अशी अपेक्षा भारताकडून व्यक्त करण्यात आली आहे.

leave a reply