अमेरिका-युरोपात कोरोनाच्या बळींच्या संख्येत घट, रुग्णांच्या संख्येत वाढ

बाल्टिमोर, (वृत्तसंस्था) – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसच्या साथीने जगभरात २,८२६ जण दगावले आहेत. अमेरिकेसह युरोप, ब्राझील या देशांमधील कोरोना बळींच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याची माहिती, जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली. याबरोबर जगभरातील कोरोनाव्हायरसच्या बळींची एकूण संख्या ३,४७,३७७ वर पोहोचली आहे. तर या साथीचे आतापर्यंत २३,२१,५१३ रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाव्हायरसच्या संसर्गाने अमेरिकेत गेल्या चोवीस तासात ६३८ जणांचा मृत्यू झाला आहे. याबरोबर देशातील बळींची एकूण संख्या ९९,३९६ वर पोहोचली आहे. शनिवारी अमेरिकेत १,१२७ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर रविवारी या बळींच्या संख्येत जवळपास निम्म्याहून झालेली घट लक्षणिय ठरते. या साथीने ब्राझीलमध्ये २२,६६६ जणांचा बळी घेतला असून गेल्या चोवीस तासातील ६५३ जणांचा यात समावेश आहे. तर रविवारी युरोपमध्ये ९२८ जण या साथीने दगावले.

जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या साडेपंचावन्न लाखांच्या जवळ पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात यामध्ये ९६,५०५ नव्या रुग्णांची भर पडल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. यामध्ये अमेरिकेतील वीस हजाराहून अधिक तर युरोपमधील १९,३२७, ब्राझीलमधील १५,८१३ आणि रशियातील ८,९४६ नव्या रुग्णांचा समावेश आहे. रशियातील एकूण रुग्णांची संख्या साडेतीन लाखांच्या वर पोहोचली असून अमेरिका, ब्राझीलनंतर रशियामध्ये या साथीचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू केलेली इमर्जन्सी जपानने मागे घेतली आहे. तर या साथीमुळे पुढच्या वर्षी ढकलण्यात आलेली ऑलिम्पिकची स्पर्धा आयोजित करण्यासाठी या साथीची लस शोधणे आवश्यक आहे, असे विधान जपानचे पंतप्रधान अॅबे शिंजो यांनी केले. तर युरोपीय देशांमध्ये लॉकडाउन मागे घेण्याची स्पर्धाच लागली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्रीसने कॅफे, रेस्टॉरंट आणि प्रवासी बोटी सुरू केल्या आहेत. तर  जुलै महिन्यापासून परदेशी पर्यटक स्पेनमध्ये बुकिंग करू शकतात, अशी घोषणा स्पेनच्या पर्यटनमंत्र्यांनी केली.

leave a reply