बलोचिस्तानातील प्रत्येक घरात एकजण बेपत्ता

- बलुच नेत्यांनी पाकिस्तानच्या भयंकर अत्याचारांचा पाढा वाचला

पॅरिस, (वृत्तसंस्था) – बलोचिस्तानातील प्रत्येक घरात किमान एक जण बेपत्ता आहे. यामध्ये शेकडो महिला व मुलांचाही समावेश आहे. पाकिस्तानचे लष्कर बलुची तरूण विद्यार्थी व राजकीय कार्यकर्ते यांची सर्रासपणे हत्या घडवीत आहे. पाकिस्तानात अल्पसंख्यांक असलेल्या बलुच जनतेचा नरसंहार सुरू असताना आंतरराष्ट्रीय समुदायाला  हस्तक्षेप करावाच लागेल, अशी कळकळीची मागणी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झालेल्या  ‘प्रिव्हेंट जेनोसाईड इन बलोचिस्तान अँन्ड एलिमिनेशन इमपुनिटी’ या व्हर्च्युअल परिषदेत करण्यात आली.  यात जगभरातील बलुची संघटनांसह  या क्षणी बलोचिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांनी ही सहभाग घेतला.  या सर्वांनी पाकिस्तान बलुची जनतेवर करीत असलेल्या अत्याचारांना वाचा फोडली.              

गेल्या आठवड्यात बलोचिस्तानच्या वेगवेगळ्या भागातून बरेच जण गायब झाले होते. यात ३०० महिला आणि २०० बालकांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या लष्करानेच त्यांचे अपहरण घडवून आणले असावे. जगभरात कोरोनाव्हायरसची साथ आलेली असताना त्याचा गैरफायदा घेऊन पाकिस्तान बलुची जनतेवरील अत्याचार अधिकच तीव्र करीत आहेत. पाकिस्तानला केवळ बलोचिस्तानच्या नैसर्गिक साधनसंपत्तीत स्वारस्य आहे. त्यांची लूटमार करणे एवढेच पाकिस्तानचे ध्येय आहे, अशी जळजळीत टीका या परिषदेत बलोच नेते आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.                                      

इटालियन पत्रकार फ्रान्सिको मारिनो यांनी बलोचिस्तानमधला नरसंहार शांतपणे घडविला जात आहे, असे सांगून त्यावर तीव्र चिंता व्यक्त केली.  तर एका युरोपियन सदस्याने बलोचिस्तानमध्ये सामूहिक थडगी आढळल्याचे सांगितले होते.  पण त्यावर युरोपिय महासंघाकडून कोणतीही कारवाई झाली नाही.  तसेच मारिनो यांनी युरोपात झालेल्या बलोच पत्रकाराच्या हत्येकडे लक्ष वेधले.                      

गेली अनेक वर्षे बलोचिस्तानच्या या संर्घषाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत या परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. तर बलुच कार्यकर्त्या नायला बलोच यांनी पाकिस्तान हा कट्टर व धर्मांग देश असल्याचा घणाघाती आरोप करुन बलोचिस्तान म्हणजे पाकिस्तान नाही. तो स्वतंत्र देश असल्याचे ठासून सांगितले. तर बलोचिस्तानमधून या व्हर्च्युअल परिषदेत सहभागी झालेल्या मामा कादीर बलोच यांनी आपण क्वेटामधील एका घरातून बोलत असल्याचे सांगून या घरातील एक जण बेपत्ता असल्याची माहिती दिली. पाकिस्तानी लष्कराकडून अशा प्रकारचे अत्याचार इथे सातत्याने केले जातात, अशी विदारक माहिती यावेळी मामा कादीर बलोच यांनी दिली.                                                

पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी बलोच जनतेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या अत्याचारांची गंभीर दखल घेण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे. बलोच जनतेची संख्या अत्यंत कमी असून त्यांच्यावर अत्याचार करणारे याचा फायदा घेत आहे, अशी जळजळीत टीका हुसेन हक्कानी यांनी केली. पॅरिसमधील या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बलुचींवरील अत्याचाराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांवरील हिंसक कारवाई म्हणजे मानवाधिकारांचे हनन असल्याचा दावा करणारी पाश्चिमात्य माध्यमे बलोचिस्तानमधील पाकिस्तानच्या या अत्याचाराबाबत चकार शब्द काढायला तयार नाहीत. यामुळे पाश्चिमात्य माध्यमांचा दुपट्टीपणाही उघड झाल्याचे दिसत आहे. 

leave a reply