भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या साडे आठ लाखांजवळ

महाराष्ट्रात चोवीस तासात ८,१३९ नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या साडे आठ लाखांजवळ पोहोचली आहे. शनिवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासातच देशात २७,११४ नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या ८ लाख २१ हजारांवर पोहोचली होती. मात्र रात्रीपर्यंत विविध राज्यात २५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या ८ लाख ४७ हजारांच्या पुढे पोहोचल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्रातच चोवीस तासात ८,१३९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Corona-Indiaदेशात चोवीस तासात नवे रुग्ण सापडण्याचा नवा उच्चांक नोंदविला गेला. गुरुवारी देशात २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी २७ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. शनिवारी दिवसभरात नव्या रुग्ण संख्येचा आणखी नवा उच्चांक नोंदविला जाईल, अशी भितीदायक आकडेवारी रात्रीपर्यंत विविध राज्यांकडून जाहीर झाली आहे.

महाराष्ट्रात चोवीस तासात २२३ जणांचा बळी गेला आहे. यामुळे राज्यातील या साथीने दगावलेल्यांची संख्या १० हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच चोवीस तासात ८,१३९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णांची संख्या २ लाख ४६ हजारांच्या पुढे गेली आहे. तामिळनाडूत दिवसभरात ३९६५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६४ जणांचा बळी गेला आहे. यामुळे या राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यू १९०० वर गेले असून रुग्णांची संख्या एक लाख ३५ हजारांजवळ पोहोचली आहे.

कर्नाटकात २७९८ नवे रुग्ण आढळले आहेत. बंगळुरू आणि आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारने १४ ते २२ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दिल्लीत १,७८१ नव्या रुग्णांची नोंद झाली. उत्तरप्रदेशात सुमारे १४०० नवे रुग्ण सापडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये चोवीस तासात १३४४ नवे रुग्ण सापडले आहेत. गुजरातमध्ये ८७२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना या साथीने बरे होणाऱ्यांचा दरही वाढला आहे. देशात या साथीचे रुग्ण बरे होण्याचा दार ६२.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

leave a reply