भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कोटीवर

नवी दिल्ली – देशात आतापर्यंत आढळलेल्या कारोनाच्या रुग्णांची संख्या एक कोटीजवळ पोहोचली आहे. तसेच या साथीमुळे १ लाख ४५ हजार जण दगावले आहेत. या पार्श्‍वभूमीवर लवकरच भारतात लस उपलब्ध होईल, असे संकेत पुन्हा एकदा आरोग्य मंत्रालयाने दिले. लसीकरण करून घेणे बंधनकारक नसून ऐच्छिक आहे. तसेच लसीचे दोन डोस असतील आणि दूसरा डोस घेतल्यावर दोन आठवड्यानंतर अ‍ॅन्टीबॉडीजची आवश्यक मात्रा शरीरात विकसित होईल, असा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

देेशात दरदिवशी आढळणार्‍या कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. शुक्रवारी २२ हजार ९८० नवे रुग्ण आढळून आले. यामुळे देशात या साथीच्या रुग्णांची संख्या ९९ लाख ७९ पर्यंत पोहोचली. तर शुक्रवारी रात्रीपर्यंत ही संख्या ९९ लाख ९० हजारांच्या पुढे गेली आहे. शनिवारी देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक कोटींच्या पुढे पोहोचेल हे स्पष्ट होत आहे.

त्याचवेळी देशात या साथीच्या बरे होणार्‍या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या देशात केवळ ३ लाख १३ हजार ८३१ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. ही संख्या आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या केवळ ३.१४ टक्के इतकी आहे. ही मोठी दिलासादायक बाब ठरते असा दावा केला जातो.

दरम्यान सरकारने कोरोनाच्या लसीवरून सामान्यांना पडणार्‍या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास सुरुवात केली आहे. यातून कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होईल, याचे संकेत सरकार वारंवार देत आहे. देशात कोरोनाच्या लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून भारतात उपलब्ध होणारी लस दुसर्‍या देशातील लसीइतकीच प्रभावी असेल, अशी ग्वाही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये आजारी व्यक्ती, ५० वर्षांवरील नागरिक, तसेच आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात येईल. मात्र लस घेणे कोणासाठी बंधनकारक नसेल. पण आपल्या व आपल्या कुटुंबांच्या सुरक्षेसाठी लस घ्यावी, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

leave a reply