जगातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाच कोटींवर पोहोचली

नवी दिल्ली – शनिवारी जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाच कोटींच्या पुढे पोहोचली. एका दिवसात जगभरात ५ लाख ९८ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असून ७ हजार ४४५ जण दगावले आहेत. एकट्या अमेरिकेत चोवीस तासात १,२४,३९० नवे रुग्ण आढळले आणि १०३१ रुग्णांचा बळी गेला. त्यानंतर फ्रान्समध्ये ८६ हजार ८०० नवे रुग्ण आढळले.

युरोप आणि अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी सारख्या युरोपीय देशांना पुन्हा लॉकडाऊन करावे लागले आहे. ब्रिटनमध्ये शनिवारच्या दिवसात ४१३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आणि २४ हजार ९५७ नवे रुग्ण आढळून आले. जर्मनीत या साथीच्या १६ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. रशियात कोरोनाचे २० हजार ४९८ नवे रुग्ण आढळले.

दरम्यान, जगभरातील कोरोनामुळे आतापर्यंत १२ लाख ५८ हजार जणांचा बळी गेला आहे. या साथीची लागण झालेल्या ३ कोटी ५६ लाख जण बरे झाले आहेत. सध्या जगभरात कोरोनाचे १ कोटी ३४ हजार ॲक्टिव्ह केसेस असून यातील ९२ हजार जणांची स्थिती चिंताजनक असल्याचा अहवाल आहे.

leave a reply