‘मलाबार’मुळे अस्वस्थ झालेल्या चीनकडून ऑस्ट्रेलियाला आर्थिक परिणामांची धमकी

पणजी/बीजिंग- ‘क्वाड’ देशांच्या पहिल्यावहिल्या मलाबार युद्धसरावातील ऑस्ट्रेलियाच्या सहभागामुळे चीन कमालीचा अस्वस्थ झाला आहे. मलाबार युद्धसरावासाठी चीनच्या सागरी हद्दीपर्यंत युद्धनौका रवाना करणार्‍या ऑस्ट्रेलियाने अमेरिकेच्या टोळीमध्ये सहभागी होऊ नये. अन्यथा ऑस्ट्रेलियाला आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी चीनच्या सरकारी मुखपत्राने दिली. पण चीनच्या धमकीकडे दुर्लक्ष करुन ऑस्ट्रेलियाने मलाबार युद्धसरावाच्या दुसर्‍या टप्प्यात सहभागी होण्याची तयारी सुरू केली असून ऑस्ट्रेलियन विनाशिका अरबी समुद्राच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. या दुसर्‍या टप्प्यातील युद्धसरावात भारताची विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’ तसेच अमेरिकेची अजस्त्र विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस निमित्झ’ सहभागी होणार आहे.

कोरोनाव्हायरसचा फैलाव, आपल्या देशातील राजकीय हस्तक्षेप तसेच व्यापारी मतभेद यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियाने चीनच्या कम्युनिस्ट राजवटीवर जोरदार हल्ले चढविले आहेत. तर कोरोनाचा उगम चीनच्या वूहान शहरातूनच झाल्याचा आरोप व हाँगकाँगमधील लोकशाहीवादी निदर्शकांना पाठिंबा दिल्यामुळे चीनने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात आर्थिक युद्ध पुकारले आहे. त्यातच गेल्या आठवड्यात चीनच्या नाकावर टिच्चून ऑस्ट्रेलियाने भारत, अमेरिका आणि जपानबरोबरच्या ‘मलाबार २०२०’ युद्धसरावासाठी आपली विनाशिका रवाना केल्यामुळे चीन कमालीचा बिथरला आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्राने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्‍कॉट मॉरिसन यांच्यावर हल्ला चढविला.

‘अमेरिकेच्या चीनविरोधी कारवायांमध्ये सहभागी होऊन ऑस्ट्रेलियाने मोठा धोका ओढावून घेतला आहे. अमेरिकेशी हातमिळवणी करुन हाती काही लागणार नाही हे ऑस्ट्रेलियाने जाणून घ्यावे. या घोडचुकीसाठी ऑस्ट्रेलियाला मोठ्या आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल’, असे चीनच्या मुखपत्राने धमकावले. फार उशीर होण्याआधी ऑस्ट्रेलियाने अमेरिकेबरोबरच्या सहकार्यातून माघर घ्यावी, असा इशाराच या चिनी मुखपत्राने दिला. दोन दिवसांपूर्वीच चीनने सुमारे १५० अब्ज डॉलर्सच्या ऑस्ट्रेलियन वस्तूंची आयात रोखल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे दोन्ही देशांचे संबंध विकोपाला गेले असून नजिकच्या काळात चीन व ऑस्ट्रेलियामध्ये राजनैतिक, व्यापारी व सामरिक पातळीवरही संघर्ष पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

म्हणूनच ऑस्ट्रेलियाच्या मलाबार युद्धसरावातील सहभागावर चीन आगपाखड करीत आहे. ३ नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरात ‘मलाबार २०२०’ अंतर्गत भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियन युद्धनौकांचा मोठा सराव पार पडला. तर याच युद्धसरावाचा दुसरा टप्पा १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान अरबी समुद्रात पार पडणार आहे. या युद्धसरावासाठी अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस निमित्झ’ अरबी समुद्रासाठी रवाना झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या एकूण ७० युद्धनौका या सरावात सहभागी होणार असून अरबी समुद्र ते पर्शियन आखाता दरम्यान हा युद्धसराव आयोजित केला जाणार आहे. भारतीय विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’वरील ‘मिग-२९के’ व अमेरिकन युद्धनौका ‘युएसएस निमित्झ’वरील ‘एफ-१८’ लढाऊ विमानांच्या कसरती या सरावाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

leave a reply