कोरोनाव्हायरसच्या बळींच्या संख्येत हजारोंची वाढ

रोम/वॉशिंगटन, दि २८ (वृत्तसंस्था )–  कोरोनाव्हायरसच्या साथीने पहिल्यांदाच एका दिवसात जवळपास एक हजार जणांचा बळी घेतला आहे. गेल्या २४ तासात  इटलीमधील या साथीच्या बळींची संख्या  हजाराच्या जवळ पोहोचली आहे. तर अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखावर गेली असून अवघ्या दोन दिवसात अमेरिकेत या साथीची लागण झालेले २९ हजाराहून अधिक रूग्ण आढळले आहेत. या फैलावाची तीव्रता पाहता, येत्या काळात रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढेल, अशी थरकाप उडविणारी शक्यता आरोग्य तज्ञ वर्तवित आहेत.

आता या साथीने जगभरात २८,८४१ जणांचा बळी गेला असून ६,२३,२९६ जणांना याची लागण झाली आहे. यापैकी २४ हजाराहून अधिक जण अत्याव्यस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. जगभरातील चार देश वगळता इतर सर्वच देश या साथीच्या कचाट्यात सापडले आहेत.

एकट्या इटलीमध्ये चोवीस तासात ९६९ जण दगावले असून आतापर्यंत या देशात ९,१३४ जणांचा बळी गेला आहे. पण ही माहिती शुक्रवारची असून इटलीचे सरकार एका दिवसाची आकडेवारी दुसर्या दिवशी प्रसिद्ध करते. त्यामुळे शनिवारीच इटलीतील बळींची संख्या दहा हजारांच्या पुढे जाईल, अशी दाट शक्यता समोर येत आहे. स्पेनमध्येही एका दिवसात ९०० हून अधिक जण दगावले आहेत. स्पेनमधील कोरोनाग्रस्तांची संख्या आठ हजारांनी वाढली आहे.

तर गेल्या चोवीस तासात अमेरिकेत या साथीने ३७३ जणांचा बळी घेतला असून दिवसभरात या साथीचे १८ हजार नवे रूग्ण सापडले आहेत. याबरोबर अमेरिकेतील एकूण बळींची संख्या देखील दोन हजाराकडे सरकत आहे. ब्रिटनमध्येही एका दिवसात जवळपास पाचशे जणांचा बळी गेला तर एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या सतरा हजारावर पोहोचली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याला काही तास उलटत नाही तोच या देशाचे आरोग्यमंत्री हँकॉक देखील या साथीच्या कचाट्यात सापडल्याचे निष्पन्न झाले.

इस्रायलमध्ये या साथीचे १२ बळी गेले असून साडे तीन हजार कोरोनाग्रस्त आढळेल आहेत. रशियामध्ये याचे चार बळी गेले असून १२६४ जण या साथीने ग्रासलेले आहेत. इराणमध्ये अडीच हजार दगावले आहेत. तर सौदी अरेबियामध्ये चार जणांचा बळी गेला असून १२०३ संक्रमित रूग्ण आढळले आहेत. इराकमध्ये ४२ जण दगावले असून उत्तर आफ्रिकेतील अल्जेरीयामध्ये २९ जणांचा बळी घेतला आहे.

leave a reply