चर्चेस नकार देऊन तालिबानचा अफगाणी सरकारला धक्का

काबुल, दि . २९ – अफगाणिस्तानातील अश्रफ गनी सरकारबरोबर कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यास तालिबानने नकार दिला आहे. गनी सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप तालिबानने केला आहे. यामुळे अफगाणिस्तानचे सरकार आणि तालिबान यांच्यात चर्चा घडवून आणन्याच्या प्रयत्नांना हादरा बसला आहे.

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी शनिवारी तालिबान बरोबर चर्चा करण्यासाठी २१ सदस्यांचे शिष्टमंडळ तयार केले. अफगाणिस्तानचे माजी सुरक्षा प्रमुख ‘मासूम स्तानेकझाई’ यांच्या नेतृत्त्वाखाली तयार झालेल्या या पथकात राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या समाजगटांचे प्रतिनिधी तसेच पाच महिलांचाही समावेश आहे. हे पथक तालिबानच्या नेत्यांशी चर्चा करणार होते.

अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले विषेश दूत झल्मे खलिलजाद यांनी अफगाण सरकारच्या या प्रयत्नांचे स्वागत केले होते. या वाटाघाटींमुळे अफगाणिस्तानात शांती व सुव्यवस्था प्रस्थापित होईल, असा विश्वास खलिलझाद यांनी व्यक्त केला होता. तर, गनी सरकारबरोबरच्या चर्चेसाठी आपले नेते तयार नसल्याचे तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने जाहीर केले. सदर पथक अगाणिस्तानातील सर्व गटांचे नेतृत्त्व करणारे नाही. त्यामुळे ही चर्चा शक्य नसल्याचे मुजाहिद याने म्हटले आहे. अफगाण सरकारने तालिबानचा हा आक्षेप धुडकावला आहे.

फेब्रुवारी महिन्यात कतारची राजधानी दोहा येथे तालिबान आणि अमेरिकेत शांतीकरार संपन्न झाला होता. यानुसार तालिबानने अमेरिकी सैनिकांवरील हल्ले थांबविण्याचे मान्य केले होते. तर तालिबानच्या मागणीनुसार अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य माघारी घेण्याचे कबुल केले होते. अमेरिकेबरोबर शांतीकरार झाला असला तरी आपण अफगाण सरकारला मान्यता दिलेली नाही, हे तालिबानकडून वारंवार सांगितले जात होते. तालिबाने अफगाणी सैन्यावरील हल्लेही सुरू ठेवले होते. आता पुन्हा एकदा अफगाणी सरकारच्या वैध्यतेचा मुद्दा उपस्थित करुन तालिबान अफगाणिस्तानात नव्या संघर्षाला तोंड फोडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

leave a reply