तिबेटवरील कब्जा ही चीनची सुरूवात

- तिबेटच्या निर्वासित सरकारच्या प्रमुखांचा इशारा

तिबेटवरील कब्जानवी दिल्ली – ‘भारत व चीनमधील बफर झोन असलेला तिबेट चीनच्या ताब्यात जाण्याने भारताला जबरदस्त हानी सहन करावी लागली. यामुळे भारताची सीमा असुरक्षित बनली आणि लष्करावरील खर्च प्रचंड प्रमाणात वाढला. पण चीनचे हे तिबेटवरील आक्रमण म्हणजे केवळ सुरूवात आहे. गलवान खोर्‍यात चीनने भारतीय सैनिकांवर केलेला हल्ला हेच सिद्ध करतो. तिबेट म्हणजे चीनसाठी पंजा असून लडाख, नेपाळ, सिक्कीम, भूतान आणि अरुणाचल प्रदेश ही या पंजाची पाच बोटे असल्याचे चीन मानतो. त्यावर कब्जा करण्याची चीनच्या कम्युनिस्ट राजवटीची महत्त्वाकांक्षा आहे’, अशा शब्दात भारतातील तिबेटच्या निर्वासित सरकारचे अध्यक्ष लॉबसांग संगेय यांनी बजावले आहे. चीनपासून सार्‍या आंतरराष्ट्रीय समुदायाला धोका संभवतो, असा सज्जड इशारा संगेय यांनी दिला.

‘सेंटर फॉर डेमोक्रसी, प्ल्युरलिझम अँड ह्युमन राईटस्’ने (सीडीपीएचआर) नवी दिल्लीत आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलताना लॉबसंग संगेय यांनी चीनच्या खतरनाक इराद्यांपासून सावध राहण्याचे आवाहन भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. तिबेट गिळंकृत करून चीन कधी स्वस्थ बसणार नाही. तर लडाख, नेपाळ, सिक्कीम, भूतान आणि अरुणाचल प्रदेश यांचा ताबा घेण्याच्या योजनेवर चीन काम करीत आहे. हे चीनचे परराष्ट्र धोरण असून गलवान खोर्‍यात भारतीय सैनिकांवर चीनने चढविलेला हल्ला हा या योजनेच्या अंमलबजावणीचा भाग होता, असे संगेय म्हणाले. तसेच तिबेटमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ती चीनची ब्ल्यू प्रिंट ठरते. झिजियांग, हॉंगकॉंगमध्येही हेच सुरू आहे. याकडे दुर्लक्ष न करता भारताने यातून धडा घेऊन चीनबरोबर व्यवहार करावा, असे कळकळीचे आवाहन संगेय यांनी केले.

बहुविधता, वैविध्य, मानवाधिकार आणि स्वातंत्र्य ह्या भारताला एकसंघ ठेवणार्‍या गोष्टी आहेत. बहुविधता हा भारताचा आधार आहे. पण चीन अधिकाधिक हुकूमशाही लादत जाणारा देश असून याचा प्रयोग चीन आशियामध्ये करीत आहे. चीनच्या या एकाधिकारशाहीच्या व एकतंत्री धोरणापेक्षा भारताचे लोकशाहीवादी विविधतेचा पुरस्कार करणारे विकासवादी धोरण अधिक श्रेयस्कर ठरते, असे सांगून संगेय यांनी यापासून भारतासह जगालाही सावधानतेचा इशारा दिला.

चीनची विस्तारवादी धोरणे जगासाठी घातक ठरतील. आंतरराष्ट्रीय समुदायाने अधिक वेळ न वाया न दवडता या आघाडीवर अधिक सावधानता दाखविण्याची आवश्यकता आहे. तिबेट आणि झिंजियांगमधील मानवाधिकारांच्या हननाविरोधात जाऊन चीनच्या विरोधात खडे ठाकण्याची हीच वेळ आहे, असे लॉबसंग संगेय पुढे म्हणाले.

गरीबीचे उच्चाटन करण्याच्या नावाखाली चीन तिबेटमध्ये आपल्या मूळ भूमीतील नागरिकांना वसवित आहे. याद्वारे तिबेटची संस्कृतिक ओळख पुसून टाकण्याचा चीनचा कट आहे. अशा एकाधिकारशाही व एकतंत्राला जगात थारा असू शकत नाही. लोकशाहीला जागा नसलेला हुकूमशाहीतील विकास हे चीनचे मॉडेल आहे. यापेक्षा लोकशाहीद्वारे विकासाचे भारताचे मॉडेल सर्वोत्तम ठरते, असे सांगून संगेय यांनी भारताचे महत्त्व अधोरेखित केले.

leave a reply