जगभरात चार दिवसात कोरोनाचे १० लाख रुग्ण

ब्रुसेल्स – कोरोनाव्हायरसने जगभरात दगावलेल्यांची संख्या सहा लाखांच्याही पुढे गेली आहे. तर या साथीचे जगभरात एक कोटी ४२ लाखाहून अधिक रुग्ण असून गेल्या चार दिवसात यामध्ये तब्बल दहा लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने ही धक्कादायक माहिती प्रसिद्ध केली. तर इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी, आपल्या देशात कोरोनाचे अडीच कोटी रुग्ण असल्याची माहिती उघड करून खळबळ उडवून दिली आहे. इराणने याआधी ‘जागतिक आरोग्य संघटने’ला (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार, इराणमध्ये २,६९,४४० रुग्ण असल्याची नोंद आहे.

World-Coronaजागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या साथीने गेल्या चोवीस तासात जगभरात ५,६८२ दगावले असून आतापर्यंत या साथीने जगभरात ६,००,५२० जणांचा बळी घेतला आहे. अमेरिकेतील या साथीच्या बळींची संख्या १,४२,१२७ वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात या साथीने अमेरिकेत ९१२ तर ब्राझीलमध्ये १,१६३ जणांचा बळी घेतला. ब्राझीलमध्ये हा साथीने ७७,९६३ जण दगावले आहेत. तर युरोपमधील या साथीच्या बळींची संख्या १,९८,८५३ वर पोहोचली आहे.

या साथीच्या जगभरातील रुग्णांची संख्या भयावहरित्या वाढत असून गेल्या चोवीस तासात जगभरात २,३७,७४३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी अमेरिका आणि ब्राझील या दोन आघाडीच्या देशांमध्येच एक लाख नवे रुग्ण आढळले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी अमेरिकेत सत्तर हजाराहून नवीन रुग्ण सापडले असून शुक्रवारी ७७,६३८ नगर रुग्णांची नोंद झाली आहे. ब्राझीलमध्ये या साथीचे चोवीस तासात ३४,७७० नवे रुग्ण समोर आले आहेत. आताच एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने जगभरात शंभर तासांमध्ये दहा लाख नव्या रुग्णांची नोंद झाल्याचा दावा केला आहे.

World-Coronaत्यातच इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी शनिवारी साऱ्या जगाला हादरवून टाकणारी माहिती दिली. या साथीने इराणमध्ये आतापर्यंत १४ हजार जण या साथीने दगावले आहेत. तर २,६९,४४० रुग्ण असल्याची माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दिली होती. पण इराणने जाहीर केलेल्या एकूण रुग्णसंख्येच्या दसपट रुग्ण आपल्या देशात असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी केली आहे. इराणमध्ये किमान अडीच कोटी रुग्णांना या साथीची लागण झाली असून साडेतीन कोटी जणांना या साथीची लागण होण्याची शक्यता असल्याचे रोहानी म्हणाले. इराणची एकूण लोकसंख्या आठ कोटीच्या घरात आहे. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी केलेला दावा भयावह इशारे देत आहे.

leave a reply