अमेरिकेसह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपानमध्ये साथीची तीव्रता वाढली

वॉशिंग्टन – अमेरिकेसह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व जपानसारख्या देशांमध्ये कोरोना साथीची तीव्रता भयावहरित्या वाढत असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेत एका महिन्याच्या अवधीत कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 138 टक्क्यांनी वाढली आहे. वाढणाऱ्या रुग्णांमध्ये मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असून एका आठवड्यात एक लाख 80 हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटनमध्ये एका आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या पाच टक्क्यांनी वाढून 38 हजारांवर गेली आहे. जपानमध्ये दरदिवशी आढळणाऱ्या रुग्णसंख्येन 21 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर ऑस्ट्रेलियात प्रथमच 24 तासांमध्ये एक हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत.

अमेरिकेसह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपानमध्ये साथीची तीव्रता वाढली2019 सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात उडविलेला हाहाकार अद्यापही कायम आहे. अमेरिकेच्या ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 21 कोटी, 40 लाखांवर गेली आहे. तर 44 लाख, 70हजारांहून अधिक जण साथीत दगावले आहेत. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू असून त्यासाठी कोरोनाचा ‘डेल्टा व्हेरिअंट’ कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे.

अमेरिकेत गेल्या महिन्याभरात रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेतील सरासरी रुग्णसंख्या दीड लाखांच्या वर जाऊन पोहोचली आहे. रुग्णालयात दाखल करावे लागलेल्या रुग्णांची संख्या एक लाख, 1 हजार 50वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत ही वाढ तब्बल 147 टक्के असल्याचे सांगण्यात येते. कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या या आठवड्यात सरासरी 1100 वर गेली असून बुधवारी 1,458 जणांचा बळी गेला आहे.
अमेरिकेतील या वाढत्या रुग्णसंख्येत मुलांचा मोठा हिस्सा आहे. अवघ्या एका आठवड्यात 1 लाख, 80 हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत ही वाढ 50 टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. यासाठी शाळा हॉटस्पॉट ठरल्याचे समोर येत आहे. बुधवारी संपलेल्या आठवड्यात 23 मुलांचा बळी गेला असून याआधीच्या आठवड्यात आठ मुले दगावली होती. अमेरिकेतील सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या प्रांतांमध्ये फ्लोरिडा, अलाबामा, लुईझियाना, मिसिसिपी व जॉर्जिआ या प्रांतांचा समावेश आहे.

ब्रिटनमध्ये 24 तासांमध्ये 38 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत पाच टक्के वाढ झाली आहे. कोरोनामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या प्रतिदिन 140वर गेली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 24 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. लसीकरण झालेल्या नागरिकांना पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाणही वाढत असून एका आठवड्यात अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये 29 टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगण्यात येते.

अमेरिकेसह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपानमध्ये साथीची तीव्रता वाढलीजपानमध्ये 24 तासांमध्ये 21 हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून राजधानी टोकिओ ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. जपान सरकारने देशातील 21 भागांमध्ये आणीबाणी घोषित केली असून सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणीबाणी कायम राहणार आहे. न्यूझीलंडमध्ये एका आठवड्यात 277 कोरोनाचे रुग्ण आढळले असून लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी केली. ऑस्ट्रेलियातही प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला असून रुग्णांची संख्या प्रतिदिन एक हजारांहून अधिक नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, चीनने कोरोनाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा अमेरिकेला लाक्ष्य केले आहे. अमेरिका चीनला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न करीत असून त्याने अमेरिकेचे अपराध धुतले जाणार नाहीत, असा आरोप चीनचे वरिष्ठ अधिकारी फु काँग यांनी केला. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडून कोरोनासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध होणार असून या पार्श्‍वभूमीवर चीनने अमेरिकेवर हा आरोप केल्याचे समोर येत आहे.

leave a reply