अमेरिकेसह युरोपात ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ

- ५० लाखांहून अधिक पक्ष्यांची कत्तल

‘बर्ड फ्ल्यू’ची साथवॉशिंग्टन/लंडन/पॅरिस – कोरोनाच्या साथीतून जग बाहेर पडत असल्याचे संकेत मिळत असतानाच अमेरिका व युरोपिय देशांना ‘बर्ड फ्ल्यू’चा फटका बसला आहे. गेल्या महिन्यापासून अमेरिका, ब्रिटन व फ्रान्समध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा नवा उद्रेक समोर आला आहे. अमेरिकेसह ब्रिटन व फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सुमारे ५० लाखांहून अधिक पक्ष्यांची कत्तल करणे भाग पडले आहे. यात कोंबड्यांसह टर्की व बदकांचा समावेश आहे. गेल्या सहा महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर आलेली ही ‘बर्ड फ्ल्यू’ची तिसरी साथ ठरली आहे. गेल्या वर्षी युरोपिय देशांसह जपान, रशिया तसेच इस्रायलला ‘बर्ड फ्ल्यू’चा मोठा फटका बसला होता.

गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत युरोपसह जपान, रशिया व इस्रायलमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ची मोठी साथ आली होती. इस्रायलमध्ये आलेल्या साथीदरम्यान आंतरराष्ट्रीय तज्ञांनी त्याचे रुपांतर मोठ्या जागतिक साथीत होऊ शकते, असा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व युरोपिय देशांमध्ये आलेली साथ लक्ष वेधून घेणारी ठरते. अमेरिकेत फेब्रुवारी महिन्यापासून ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीला सुरुवात झाली असून आयोवा, मेरीलॅण्ड, केंचुकी, डेलावेअर, विस्कॉन्सिनसह १३ राज्यांमध्ये फैलाव झाल्याचे समोर आले आहे.

आयोवा राज्यात १० लाखांहून अधिक कोंबड्या व टर्की पक्ष्यांची कत्तल करण्यात आली आहे. तर मेरीलॅण्डमध्ये पाच लाखांहून अधिक कोंबड्यांना मारणे भाग पडल्याचे सूत्रांनी सांगितले. आयोवा हे राज्य अमेरिकेच्या ‘पोल्ट्री’ उत्पादनातील आघाडीचे राज्य असल्याने त्याला बसलेला फटका ‘पोल्ट्री’ उद्योगासाठी संवेदनशील मानला जातो. यापूर्वी २०१५ साली अमेरिकेत मोठी ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ आली होती. त्यानंतर आलेली ही सर्वात मोठी साथ ठरली आहे. २०१५ साली आलेल्या साथीत अमेरिकेतील पाच कोटी पक्ष्यांची कत्तल करणे भाग पडले होते.

अमेरिकेबरोबरच युरोपातील ब्रिटन तसेच फ्रान्सलाही ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीचा धक्का बसला आहे. फ्रान्समध्ये नव्या वर्षात दुसर्‍यांदा ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ आली आहे. यापूर्वी दक्षिण फ्रान्समध्ये आलेल्या साथीत सुमारे ४० लाख पक्षी व प्राण्यांची कत्तल करण्यात आली होती. नवी साथ पश्‍चिम भागातील लॉयर रिजनमध्ये फैलावत असून आतापर्यंत १२ लाख कोंबड्यांना मारणे भाग पडले आहे. पुढील काही दिवसांमध्ये ३० लाखांहून अधिक कोंबड्यांची कत्तल करण्यात येईल, असे फ्रेंच यंत्रणांनी स्पष्ट केले.

ब्रिटनच्या ‘इस्ट अँग्लिआ’ भागात बर्ड फ्ल्यूची साथ आली असून सुमारे ३५ हजार बदकांची कत्तल करण्यात आली आहे. ‘इस्ट अँग्लिआ’मधील ‘सफोक कौंटी’मध्ये १५ दिवसांच्या अवधीत बर्ड फ्ल्यूच्या साथीचा दोनदा उद्रेक झाल्याची माहिती ब्रिटीश माध्यमांनी दिली. गेल्या काही वर्षात युरोप व आशियाई देशांना सातत्याने ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीचा फटका बसत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी २०१४ तसेच २०१६ सालीही युरोपमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ची मोठी साथ आली होती. तर २०२० साली आलेल्या साथीमध्ये जवळपास एक कोटी पक्ष्यांचा बळी गेला होता.

leave a reply