वर्षाच्या अखेरीपर्यंत येमेनमध्ये दीड लाखांहून अधिक जणांची उपासमार होईल

- संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा

उपासमारकैरो/सना – गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेले गृहयुद्ध येमेनमधील जनतेसाठी भीषण संकट ठरले आहे. पण युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे येमेनचे हे संकट अक्राळविक्राळ स्वरुप धारण करणार आहे. येमेनमधील किमान एक लाख, ६१ हजार जणांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघ आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय सहाय्य गटांनी दिला. आंतरराष्ट्रीय समुदायाने येमेनकडे दुर्लक्ष केले तर त्याचे भयावह परिणाम समोर येतील, असेही संयुक्त राष्ट्रसंघाने बजावले.

२०१४ सालापासून येमेनमध्ये गृहयुद्ध पेटले आहे. या संघर्षात तीन लाख, ७७ जणांचा बळी गेला असून यामध्ये ८५ हजारांहून अधिक मुलांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. गेल्या वर्षभरातील संघर्षातच १०,२०० मुले दगावल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केली. गेल्या अडीच महिन्यांमध्ये येमेनमधील संघर्षाची तीव्रता वाढल्यामुळे येथील जनतेपर्यंत मानवतावादी सहाय्य पुरविण्यातही मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत.

येमेनच्या एकूण लोकसंख्येपैकी ७० टक्के अर्थात किमान दोन कोटी १० लाख जनतेला मानवतावादी सहाय्याची आवश्यकता असल्याचा इशारा युनिसेफने काही दिवसांपूर्वीच दिला होता. तर पाच वर्षांखालील जवळपास चार लाख मुले भयंकर कुपोषणाची शिकार ठरत असल्याची चिंता युनिसेफने व्यक्त केली होती. येमेनमधील संघर्ष थांबवून येथील जनतेपर्यंत मानवतावादी सहाय्य पोहोचविण्याचे प्रयत्न आत्तापर्यंत अपयशी ठरले आहेत.

उपासमारअशा परिस्थितीत, युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यामुळे त्याचा थेट परिणाम येमेनमधील संकटावर होईल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘इंटिग्रेटेड फुड सिक्युरिटी फेझ क्लासिफिकेशन-आयपीसी’ने आपल्या अहवालात दिला. गेल्या सात वर्षांच्या गृहयुद्धाच्या काळात येमेनमधील जनता बर्‍याच प्रमाणात युक्रेनमधून येणार्‍या अन्नधान्यावर अवलंबून होती. येमेनच्या एकूण गहू आयातीपैकी ३० टक्के गहू एकट्या युक्रेनकडून येतो. युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यामुळे येमेनची गव्हाची आयात बंद झाल्याचे ‘आयपीसी’ने आपल्या अहवालातून लक्षात आणून दिले.

आंतरराष्ट्रीय समुदायाने येमेनमधील या संकटाकडे दुर्लक्ष केले तर वर्षअखेरीपर्यंत येमेनमधील कुपोषितांच्या संख्येत महिलांचाही समावेश होईल. किमान १३ लाख महिला कुपोषणाला सामोरे जातील, असा इशारा आयपीसीने दिला. तर दुर्भिक्ष्याला सामोरे जाणार्‍या येमेनमधील मुलांच्या संख्येतही भयावह वाढ होईल व यामुळे शारीरिक दुर्बलता वाढेल किंवा यात त्यांचा बळी जाईल, असे युनिसेफच्या कार्यकारी अध्यक्षा कॅथरिन रसेल यांनी बजावले आहे.

leave a reply