‘अँटिलिया’बाहेरील स्फोटकांचे प्रकरण गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या ‘अँटिलिया’ या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गेल्या आठवड्यात सापडली होती. या स्कॉर्पिओच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने या प्रकरणातील गूढ अधिक वाढले आहे. स्फोटक प्रकरणात महत्त्वाचा दुवा असलेल्या या स्कॉर्पिओ मालकांनी आत्महत्या केली का त्याचा खून झाला, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

गेल्या आठवड्यात ‘अँटिलिया’ इमारतीपासून जवळच पार्क केलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीत २० जिलेटिनच्या काड्या, डेटोनेटर्स आणि अंबानी यांना धमकी देणारे पत्र आढळून आले होते. यामुळे मोठी खळबळ माजली होती. हे वाहन त्याआधी दोन दिवसापूर्वी ऐरोलीतून चोरीला गेले होते. या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची यासंबंधी चौकशी झाली, त्यावेळी त्यांनी आपली गाडी ऐरोलीमध्ये बंद पडली. त्यामुळे ती तिथेच रस्त्याजवळ लावून पुढे टॅक्सी पकडून मुंबईत आपल्या कामासाठी आलो होतो, असा जबाब दिला होता. मात्र दुसर्‍या दिवशी तिच गाडी ‘अँटिलिया’ बाहेर पार्क होण्याआधी काही तासापूर्वी ठाण्यातूनच मुंबईत आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले होते. तसेच या घटनेनंतर तीन दिवसांनी ‘अँटिलिया’ बाहेर स्फोटके ठेवण्याची जबाबदारी ‘जैश उल-हिंद’ने उचलली होती. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले होते.

त्यामध्ये स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह मुंब्रा भागातील खाडीकिनारी सापडला. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला असे प्रश्‍न उपस्थित राहत आहेत. कारण मनसुख हिरेन हे उत्कृष्टरित्या पोहू शकत होते व मुलांनाही ते पोहण्याचे प्रशिक्षण द्यायचे अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. तसेच गुरुवारी रात्री त्यांचे लोकेशन हे विरार भागात होते. तर त्यांचा मृतदेह सापडलेले मुंब्रा येथील ठीकाण यापासून बरेच लांब असल्याने यामागील गूढ वाढत चालले आहे.

मुंबई, ठाणे पोलीस मिळून या प्रकरणाची चौकशी करीत आहे. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकानेही यासंदर्भात तपास हाती घेतला आहे. तसेच हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी होत आहेत.

leave a reply