‘एसएफडीआर’ तंत्रज्ञानाची ‘डीआरडीओ’कडून चाचणी

- भविष्यातील आधुनिक क्षेपणास्त्रांमध्ये वापर होणार

चांदिपूर – ‘सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट’ (एसएफडीआर) या क्षेपणास्त्राला गती देणार्‍या तंत्रज्ञानाची चाचणी शुक्रवारी संरक्षण संशोधन व विकास संस्थेकडून (डीआरडीओ) घेण्यात आली. ही चाचणी पूर्णत: यशस्वी ठरली असून भविष्यात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या विकासात हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरेल, असा दावा केला जातो. ‘एसएफडीआर’ तंत्रज्ञान जगातील काही ठरावीक देशांकडेच असून याच्या चाचण्या पूर्ण झाल्यावर भारत या निवडक देशांच्या यादीत सहभागी होईल. त्यामुळे ‘एसएफडीआर’च्या चाचणीला मिळालेले हे यश अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे.

याबद्दल ‘डीआरडीओ’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘एसएफडीआर’ तंत्रज्ञान रॅमजेट प्रोपल्शन तंत्रज्ञानावर आधारीत आहे. हे एका पद्धतीचे बुस्टर इंजिन असून जे क्षेपणास्त्रांना अधिक शक्तीशाली बनवेल. रशियन कंपनीच्या मदतीने डीआरडीओने ‘एसएफडीआर’ विकसित केले आहे. शुक्रवारी ओडीशातील चांदिपूर येथील ‘डीआरडीओ’च्या प्रक्षेपण तळावरून सकाळी साडे दहा वाजता ‘एसएफडीआर’ चाचणी पार पडली. ‘एसएफडीआर’मधील ‘ग्राउंड बुस्टर’ आणि ‘नोजल लेस बुस्टर’ हे तंत्र व्यवस्थित काम करीत आहे का हे चाचणीद्वारे तपासण्यात आले. ‘एसएफडीआर’ चाचणीदरम्यान सर्व मापदंड तपासून पाहण्यासाठी टेलिमेट्री आणि रडार तैनात करण्यात आले होते, अशी माहिती ‘डीआरडीओ’कडून देण्यात आली.

‘एसएफडीआर’ तंत्रज्ञान ‘प्रोपल्शन सिस्टिम’ असून यामध्ये ‘नोझल लेस बुस्टर’ आणि फ्युएल सस्टेनर’ असे प्रोपलंट असतात. या दोन्ही गोष्टींमुळे क्षेपणास्त्राचा वेग वाढतो. यासाठी क्षेपणास्त्राला जास्त ऊर्जा मिळते. तसेच क्षेपणास्त्र लक्ष्याच्या दिशेने जात असताना या क्षेपणास्त्राचा आवाज होत नाही. तसेच हलत्या लक्ष्याचाही क्षेपणास्त्र अचूक वेध घेऊ शकते.

हे तंत्रज्ञान भविष्यात हवेतून हवेत मारा, करणार्‍या, जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांबरोबर अ‍ॅण्टी रेडिएशन क्षेपणास्त्र, जहाजभेदी क्षेपणास्त्रांमध्ये याचा अतिशय प्रभावी वापर होऊ शकतो. या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेली क्षेपणास्त्र भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल झालेल्या रफायलपासून सुखोई-३० व इतर लढाऊ विमानातही बसविली जाऊ शकतात. या रॅमजेट तंत्रज्ञानामुळे भविष्यात भारताला लांब पल्ल्याची अधिक वेगाने मारा करणारी क्षेपणास्त्र विकसित करता येतील.

एका वृत्तानुसार ‘डीआरडीओ’ ‘अस्त्र-मार्क३’ हे क्षेपणास्त्र विकसित करीत असून यामध्ये ‘एसएफडीआर’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ‘अस्त्र-मार्क१’ आणि ‘अस्त्र-मार्क२’ मध्ये ड्युअल पल्स सॉलिड रॉकेट मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. ‘अस्त्र-मार्क१’ संरक्षणदलांच्या ताफ्यात दाखल आहे, तर ‘अस्त्र-मार्क२’च्या चाचण्या सुरू आहेत. ‘अस्त्र-मार्क१’ची मारक क्षमता ११० किलोमीटर होती, तर ‘अस्त्र-मार्क२’ची मारक क्षमता १६० किलोमीटर इतकी आहे. ‘एसएफडीआर’च्या आधारे विकसित करण्यात येणार्‍या ‘अस्त्र-मार्क३’ची क्षमता ही ३५० किलोमीटर असेल.

२०१८ पासून ‘एसएफडीआर’च्या चाचण्या सुरू झाल्या होत्या. मे २०१८ मध्ये ‘एसएफडीआर’ची घेण्यात आलेली चाचणी अपयशी ठरली होती. मात्र फेब्रुवारी २०१९ सालात घेण्यात आलेल्या चाचणीला यश मिळाले होते. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी ‘एसएफडीआर’ चाचणी पार पडत असून हे तंत्रज्ञान जवळजवळ विकसित झाले आहे. फार थोड्या विकसित देशांकडे ‘एसएफडीआर’ तंत्रज्ञान असल्याने लवकरच भारताचाही या मोजक्या देशांच्या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे.

leave a reply