भारत तालिबानच्या शत्रूंना शस्त्रास्त्रे पुरवित असल्याचा पाकिस्तानचा आरोप

इस्लामाबाद – कंदहारमधील आपल्या उच्चायुक्तालयाच्या कर्मचार्‍यांना मायदेशी आणण्यासाठी गेलेले भारताचे विमान प्रचंड शस्त्रास्त्रे घेऊनच गेले होते. अफगाणी लष्कर व तालिबानविरोधी गटांसाठी ही शस्त्रे ठेवून मगच भारताचे विमान मायदेशी परतले, असा आरोप पाकिस्तानच्या माध्यमांनी लगावला आहे. निदान आत्ता तरी भारताचा डबल गेम तालिबानने समजून घ्यावा, असा इशारा पाकिस्तानची माध्यमे देत आहेत. मात्र पाकिस्तानची माध्यमे व विश्‍लेषकांखेरीज दुसर्‍या कुणीही ही बातमी दिलेली नाही. त्यामुळे यातून पाकिस्तानचा भयगंड असावा किंवा हा भारतविरोधी अपप्रचाराचा भाग असण्याची शक्यता समोर येत आहे.

10 व 11 जुलै रोजी भारतीय वायुसेनेची अवजड मालवाहतूक करणारी विमाने अफगाणिस्तानात दाखल झाली होती. तालिबान कंदहारचा ताबा घेण्याची तयारी करीत असताना, सुरक्षेच्या कारणास्तव सर्वच देशांनी इथल्या दूतावासातील आपल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना मायदेशी नेले होते. भारतानेही खबरदारीचा भाग म्हणून कंदहारमधील उच्चायुक्तालयातील 50 अधिकारी व कर्मचार्‍यांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला. यासाठीच भारतीय वायुसेनेची विमाने अफगाणिस्तानात दाखल झाली होती.

भारत तालिबानच्या शत्रूंना शस्त्रास्त्रे पुरवित असल्याचा पाकिस्तानचा आरोपमात्र या विमानांमध्ये 120 एमएम तोफांसाठी वापरले जाणारे सुमारे 40 टन इतके तोफगोळे होते, असा आरोप पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. दुसर्‍या विमानाच्या खेपेतही भारताने इतक्याच प्रमाणात तोफगोळे अफगाणिस्तानात सोडले होते, असे पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे. हा दारूगोळा व शस्त्रास्त्रे अफगाणी लष्कराला पुरविण्यात येईल. तसेच तालिबानच्या विरोधात लढण्याची तयारी करीत असलेल्या ‘नॉर्दन अलायन्स’ला देखील याचा पुरवठा केला जाईल, असे पाकिस्तानचे पत्रकार छातीठोकपणे सांगत आहेत.

याद्वारे भारत तालिबानच्या शत्रूला अधिकाधिक समर्थ बनवत आहे. एकीकडे तालिबानशी चर्चा करणारा भारत दुसर्‍या बाजूला तालिबानचा विश्‍वासघात करीत आहे. याद्वारे अफगाणिस्तानात शक्य तितका रक्तपात घडविण्याचा भारताचा हेतू आहे, असा जावईशोध पाकिस्तानातील भारतद्वेष्ट्या पत्रकारांनी लावला आहे. त्याचवेळी तालिबानने आत्ता तरी भारतापासून सावध राहण्याची गरज असल्याचा दावा या पत्रकारांनी केला. पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी झफर हिलाली यांनी तर कंदहारमधील भारतीय उच्चायुक्तालयावर तालिबानने अजूनही हल्ला का केला नाही, यावर आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

भारत तालिबानशी चर्चा करीत असल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या. यामुळे पाकिस्तान कमालीचा अस्वस्थ झाला व पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी त्यावर संताप व्यक्त केला होता. तालिबानशी चर्चा करताना भारताला लाज वाटायला हवी, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ म्हणाले होते. तालिबान पाकिस्तानची हस्तक संघटना असून त्यावर पाकिस्तानचीच संपूर्ण मालकी आहे, असा तर्क मोईद युसूफ यांच्या दाव्यामागे होता.

भारत आणि तालिबानमध्ये कुठल्याही प्रकारचा समेट होऊ नये, यासाठी पाकिस्तानने ही शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याची बातमी सोडली असण्याची दाट शक्यता यामुळे समोर येत आहे. भारतविरोधी अपप्रचारासाठी पाकिस्तानने जय्यत तयारी केली आहे. लाहोरमध्ये हफीज सईदच्या घराजवळ झालेला स्फोट म्हणजे भारताचा दहशतवाद असल्याचा आरोप करून पाकिस्तानने भारत दहशतवादी देश असल्याचा आरडाओरडा सुरू केला होता. आता तालिबानच्या विरोधी गटांना भारत शस्त्रास्त्रे पुरवित असल्याचा आरोप करून पाकिस्तान तालिबानकडून भारताच्या विरोधात कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. मात्र तालिबानची यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

तालिबानचे प्रवक्ते एकाच वेळी भारत व पाकिस्तानबाबत परस्परविरोधी विधाने करून आपली हुशारी प्रदर्शित करीत आहेत. तालिबान अफगाणिस्तानच्या सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानच्या इशार्‍यावर नाचणार नाही, असे तालिबानचे प्रवक्ते भारतीय वृत्तसंस्थांकडे सांगत आहेत. तर पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना, तालिबानचे प्रवक्ते भारताच्या विरोधात सूर लावत आहेत.

leave a reply