अमली पदार्थांच्या तस्करीत पाकिस्तानचे लष्कर व तालिबानमध्ये सहाय्य

- नाटोच्या वार्षिक अहवालात आरोप

पाकिस्तानचे लष्करब्रुसेल्स – अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये पाकिस्तानचे लष्कर, ‘आयएसआय’ तसेच तालिबान सहभागी आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनाचे बरेचसे अर्थकारण या अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळणाऱ्या पैशावर अवलंबून असते, असा आरोप नाटोने आपल्या नव्या अहवालात केला. गेल्या काही महिन्यांमध्ये जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली पाकिस्तानी नागरिकांना झालेली अटक सदर हे आरोप सिद्ध करतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नाटोच्या ‘डिफेन्स एज्युकेशन इंहान्समेंट प्रोग्राम-डीईईपी’ अर्थात ‘डीप’ या संघटनेने अमली पदार्थांच्या तस्करीमुळे निर्माण झालेल्या असुरक्षेवर विशेष अहवाल तयार केला. जगभरातील अमली पदार्थांच्या तस्करीबाबत या अहवालामध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. त्यातही तालिबान आणि पाकिस्तानी लष्कराचा या अमली पदार्थांच्या तस्करीतील हिस्सा लक्षवेधी असल्याचे यात म्हटले आहे. अमली पदार्थांच्या तस्करीसाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ने पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवादी संघटना एकत्र आणल्याचा आरोप नाटोच्या अहवालात करण्यात आला आहे.

पाकिस्तानचे लष्कर‘आयएसआय’ने दहशतवादी संघटनांना हाताशी धरून अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे विणले आणि मोठ्या प्रमाणात तस्करी घडवून आणल्याचे या अहवालाचे मुख्य लेखक डेव्हिड आर. विन्स्टन यांनी म्हटले आहे. अमली पदार्थांच्या या अवैध व्यापारावर पाकिस्तान, अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना तसेच पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय अवलंबून असल्याचा दावा विन्स्टन यांनी आपल्या अहवालात केला. पण या व्यापारामुळे जगभरात ‘नार्को-टेरर’ला बळ मिळत असल्याची गंभीर बाब विन्स्टन यांनी नाटोच्या अहवालातून लक्षात आणून दिली.

अफगाणिस्तान-पाकिस्तानातील अमली पदार्थांच्या तस्करीचे नेटवर्क, त्यावर अवलंबून असलेले दहशतवादी व कट्टरपंथियांच्या टोळ्या आणि त्यांचे तालिबान व पाकिस्तानी लष्कराबरोबरचे सहकार्य हे अफगाणिस्तानसह या क्षेत्रातील लोकशाही आणि सुरक्षा व्यवस्थेसमोर अडथळे निर्माण करीत आहेत. अफगाणिस्तानातील अमली पदार्थांची शेती व त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली नसती तर तालिबानकडे अफगाणिस्तानातील गनी यांचे सरकार उलथण्याची ताकद आलीच नसती, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. गेली काही वर्षे अफगाणिस्तानातून होणारी अमली पदार्थांची तस्करी रोडावली होती. पण गेल्या वर्षी अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेतल्यानंतर जगभरातील अमली पदार्थांची तस्करी वाढली. जगभरातील एकूण तस्करीपैकी एकट्या अफगाणिस्तानातून जवळपास ८५ टक्के अमली पदार्थांची तस्करी केली जाते, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष गटाने आपल्या अहवालात बजावले होते. अफगाण-पाकिस्तानमधील २,४०० किलोमीटर लांबीच्या सीमाभागातून अमली पदार्थांची ही तस्करी केली जाते. अफगाणिस्तानातून होणारी आणि पाकिस्तानच्या लष्कराचे पाठबळ लाभलेली ही अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी हीच वेळ असल्याचा इशारा या अहवालातून विन्स्टन यांनी दिला.

leave a reply