राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा चीनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ‘संदेश’

बीजिंग – मंगळवारी चीनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशवासियांना संबोधित केले. याद्वारे आपण नजरकैदेत असल्याच्या अफवांना जिनपिंग यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबत चीनचे पंतप्रधान ली केकियांग व कम्युनिस्ट पक्षाचे इतर काही नेते उपस्थित होते. त्यामुळे चीनमधल्या घडामोडींबाबत जगभरात सुरू असलेल्या चर्चा व केले जाणारे परस्परविरोधी दावे, निकालात काढण्यासाठीच जिनपिंग यांचे हे संबोधन आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या दहा वर्षात चीनने धोरणात्मक पातळीवर घडविलेले बदल व केलेली ऐतिहासिक कामगिरी सर्वदूर पसरविण्याची आवश्यकता आहे, असे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यावेळी म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी दिलेल्या संदेशापेक्षा त्यांची चीनच्या राष्ट्रीय वाहिनीवरील उपस्थितीतच अधिक महत्त्वाची ठरली. उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये पार पडलेल्या एससीओच्या बैठकीवरून परतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जिनपिंग सात दिवस कुणालाही भेटले नव्हते. यामुळे त्यांच्याबाबत बऱ्याच अफवा पसरल्या होत्या. जिनपिंग बीजिंग विमानतळावर उतरल्यानंतर, त्यांना ताब्यात घेण्यात आले व नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे दावे सोशल मीडियावर केले जात होते.

President Jinpingया दाव्यांची जगभरातील माध्यमांना दखल घ्यावी लागली होती. तसेच राजधानी बीजिंगमधल्या चिनी लष्कराच्या हालचालींमुळे जिनपिंग यांच्याबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यांची तीव्रता अधिकच वाढली होती. मात्र जिनपिंग यांनी हे संबोधन करून आपल्याबाबत केले जाणारे दावे म्हणजे अफवा होत्या, हे दाखवून दिले. त्यांच्यासोबत चीनचे क्रमांक दोनचे नेते व पंतप्रधान ली केकियांग यांची उपस्थिती बरेच काही सांगून जाणारी ठरते. गेल्या सात दिवसातल्या जिनपिंग यांच्या अनुपस्थितीबाबतही चीनमधील सूत्रांकडून खुलासे दिले जात आहेत.

दुसऱ्या देशातून आल्यानंतर सात दिवस क्वारंटाईनमध्ये काढण्याच्या नियमानुसार जिनपिंग कुणालाही भेटत नव्हते. यामध्ये तीन दिवस घरातच राहण्याच्या नियमाचाही समावेश आहे. याचे जिनपिंग यांनी पालन केल्याची माहिती चीनमधील सूत्रांकडून दिली जात आहे. त्यामुळे जिनपिंग यांच्याबाबत जगभरात सुरू झालेल्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आल्याची बाब उघड होत आहे. याच्या आधी चीनने ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची पूर्ण तयारी झाल्याची माहिती प्रसिद्ध करून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने आपल्या देशात सारे काही सुरळीत असल्याचे संकेत देण्याचा प्रयत्न केला होता.

16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत शी जिनपिंगच पुन्हा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदावर येतील, अशी दाट शक्यता वर्तविली जाते. मात्र जिनपिंग यांनी चीनमध्ये स्वीकारलेली झीरो कोविड पॉलिसीच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. त्यातच चीनची अर्थव्यवस्था घसरणीला लागलेली असून बेरोजगारीत होत असलेली वाढ ही जिनपिंग यांच्या नेतृत्त्वासमोर खडी ठाकलेली फार मोठी समस्या बनली आहे. चिनी कंपन्या व बँकांची अवस्था बिकट असल्याचे सांगितले जाते.

त्यातच तैवानच्या मुद्यावर अमेरिकेने स्वीकारलेल्या आक्रमक भूमिकेला प्रत्युत्तर देण्यात जिनपिंग अपयशी ठरल्याचाही समज बळावत चालला आहे. अशा परिस्थितीत चीनच्या कम्युनिस्ट पक्षावरील जिनपिंग यांची पूर्वीइतकी पकड राहिलेली नाही, असे दावे केले जातात. त्यामुळे जिनपिंग नजरकैदेत नसले आणि त्यांच्याबाबत येणाऱ्या बातम्या खोट्या ठरल्या तरीही चीनमध्ये सारे काही सुरळीत नाही, असा निष्कर्ष काही जबाबदार विश्लेषकांनी नोंदविला होता.

leave a reply