माफी देण्याची भाषा करणार्‍या पाकिस्तानच्या लष्करानेच तेहरिककडे क्षमायाचना करावी

- तेहरिक-ए-तालिबानची धमकी

इस्लामाबाद – ‘माफी ही चुकांसाठी मागितली जाते आणि आम्ही ज्याच्यासाठी संघर्ष करीत आहोत, त्यासाठी आम्ही कधीच माफी मागणार नाही. याउलट पाकिस्तानच्या लष्करानेच आमच्याकडे आपल्या जीवाची भीक मागावी’, अशी धमकी ‘तेहरिक-ए-तालिबान’ने दिली. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दोन दिवसांपूर्वी तेहरिकच्या दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करून त्यांना माफी देण्याची घोषणा केली होती. पण तेहरिकने कुरेशी यांची ऑफर धुडकावून पाकिस्तानच्या लष्करालाच धमकावले आहे.

माफी देण्याची भाषा करणार्‍या पाकिस्तानच्या लष्करानेच तेहरिककडे क्षमायाचना करावी - तेहरिक-ए-तालिबानची धमकीतालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलचा ताबा घेतल्यापासून तालिबानसंलग्न असलेल्या ‘तेहरिक-ए-तालिबान’चे पाकिस्तानातील हल्ले वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत तेहरिकच्या या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याची चिंता पाकिस्तान व्यक्त करीत आहे. नॉर्थ आणि साऊथ वझिरिस्तानच्या भागात तेहरिकचे दहशतवादी पाकिस्तानी लष्करावर जोरदार हल्ले चढवित असून काही ठिकाणी पाकिस्तानी जवानांनी पळ काढल्याचे प्रकारही घडले आहेत.

तालिबानने तेहरिकवर नियंत्रण ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पाकिस्तानने तेहरिकशी चर्चा करून वाद सोडवावा, अशी भूमिका स्वीकारली आहे. यामुळे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी तेहरिकला शरण येण्याचे आवाहन करून माफी देण्याचा प्रस्ताव दिला होता. यावर पाकिस्तानातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तेहरिकला माफी देऊन कुरेशी यांनी पाकिस्तानी जनतेचा विश्‍वासघात केल्याची टीका माध्यमांनी केली होती.

अशा परिस्थितीत, तेहरिकनेच कुरेशी यांचा प्रस्ताव धुडकावला. तसेच पाकिस्तानची यंत्रणा आमच्या मागण्या मान्य करणार असेल तरच चर्चा होऊ शकते. अन्यथा पाकिस्तानच्या लष्कराने तेहरिकसमोर क्षमायाचना करावी, असे तेहरिकने धमकावले. काही दिवसांपूर्वी तेहरिकच्या प्रमुखाने अफगाण-पाकिस्तानमधील ड्युरंड लाईन मान्य नसल्याचे सांगून पाकिस्तानातील पश्तू भागाचा ताबा घेण्याची घोषणा केली होती.

leave a reply