लाँग मार्च सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानच्या लष्कराचे इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप

इस्लामाबाद/लाहोर – शुक्रवारी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा बहुचर्चित लाँग मार्च सुरू झाला आहे. लाहोरपासून इस्लामाबादपर्यंत धडक मारणारा हा लाँग मार्च पाकिस्तानला खरेखुरे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला. इम्रान खान राजधानी इस्लामाबादवर चढाई करण्याची भाषा बोलत असतील, तर यावेळी त्यांना अशी काही अद्दल घडवू की ते पुढे कधीच लाँग मार्च काढण्याचा विचारही करणार नाहीत, अशी धमकी पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनी दिली. हा मोर्चा सुरू होण्याच्या आधी पाकिस्तानचे लष्कर व इम्रान खान यांच्यामध्ये झडलेल्या आरोप व प्रत्यारोपांच्या फैरींमुळे पाकिस्तानात अस्वस्थता पसरली आहे.

imran-khanपाकिस्तानचे पत्रकार अर्शद शरीफ यांची गेल्या रविवारी केनियामध्ये हत्या करण्यात आली. यामागे पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा आयएसआय असल्याचे आरोप इम्रान खान यांचे समर्थक करीत आहेत. त्यावर संतापलेल्या आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजूम यांनी पत्रकार परिषद संबोधित करून या आरोपांना उत्तर दिले. पाकिस्तानचे लष्करी अधिकारी चूक करतील, पण देशाशी कधीही गद्दारी करणार नाहीत. आमच्याबद्दल बरेच काही बोलले जात आहे. अशा परिस्थितीत मी शांत बसणे योग्य ठरत नाही.

लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना आपल्या बाजूने वळविण्याठी घसघशीत प्रस्ताव देण्यात आला होता व याचा मी स्वतः साक्षीदार आहे. पण जनरल बाजवा यांनी हा प्रस्ताव नाकारला व तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे लेफ्टनंट जनरल अंजूम यांनी या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

इम्रान खान यांनी आपले पंतप्रधानपद वाचविण्यासाठी जनरल बाजवा यांना हा प्रस्ताव दिला होता, हा लेफ्टनंट जनरल अंजूम यांच्या आरोपामुळे पाकिस्तानात खळबळ माजली. त्याचवेळी पाकिस्तानचे लष्कर राजकीयदृष्ट्या तटस्थच राहून राजकारणापासून दूर राहिल, ही लेफ्टनंट जनरल अंजूम यांची विधानेही माध्यमांनी उचलून धरली आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आयएसआयप्रमुखांनी केलेल्या पत्रकार परिषदेवरच प्रश्न उपस्थित केला. जर पाकिस्तानचे लष्कर तटस्थ असेल, तर मग ही पत्रकार परिषद कशासाठी? असा सवाल इम्रान खान यांनी केला. तसेच पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सरकारमध्ये असलेल्या चोरांना वाचवत असल्याची टीका इम्रान खान यांनी केली. मात्र देशासाठी आपण या विषयावर अधिक बोलणार नाही, असे इम्रान खान पुढे म्हणाले.

पाकिस्तानचे सध्याचे सरकार चोरांचे असल्याचा आरोप इम्रान खान यांनी याआधी अनेकवार केला होता. यावेळीही या चोरांना सत्तेतून खाली खेचून देशाला खरेखुरे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण लाँग मार्च आयोजित करीत असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या या लाँग मार्चमुळे पाकिस्तानच्या सुरक्षेला थेट आव्हान मिळत असल्याची टीका काहीजणांनी केली आहे. इतकेच नाही तर यामुळे पाकिस्तानात अराजक माजू शकते, याचीही जाणीव काही पत्रकार व विश्लेषकांनी करून दिली. मात्र पाकिस्तानात पुन्हा निवडणूका जाहीर केल्याखेरीज आपण माघार घेणार नाही, असे इम्रान खान यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी इम्रान खान यांच्या या लाँग मार्चवर यावेळी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अंतर्गत सुरक्षामंत्री राणा सनाउल्लाह यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात इम्रान खान यांच्या या लाँग मार्चचे काय होते, याकडे निरिक्षकांचे लक्ष लागलेले आहे.

leave a reply