कोरोना साथीचा उगम चीनच्या ‘वुहान लॅब’मधूनच

अमेरिकेच्या संसदीय समितीचा अहवाल

chinese-corona-reutersवॉशिंग्टन/बीजिंग – तीन वर्षापूर्वी चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीचा उगम वुहान लॅबमधूनच झाला असून यापुढे चीनला संशयाचा फायदा म्हणून मोकळे सोडता येणार नाही, असा निष्कर्ष अमेरिकेच्या संसदीय समितीने नोंदविला आहे. अमेरिकी सिनेटच्या आरोग्यविषयक समितीने आपला अहवाल संसदेला सादर केला असून त्यात कोरोनाचा विषाणू नैसर्गिकरित्या फैलावला हे दाखविणारे घटक उपलब्ध नसल्याचेही सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच अमेरिका व जर्मनीच्या संयुक्त संशोधनपथकानेही कोरोनाचा उगम नैसर्गिकरित्या झाला नसून त्याच्या जनुकीय रचनेत ‘मॅन्युफॅक्चर्ड’ घटक आढळल्याचा दावा केला होता.

The_Wuhan_Institut२०१९ सालच्या अखेरीस सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीत आतापर्यंत ६५ लाखांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. अमेरिका, रशिया व युरोपिय देशांसह चीनमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मात्र तीन वर्षे उलटल्यानंतरही कोरोनाचा विषाणू नक्की कसा पसरला असावा यासंदर्भात ठाम माहिती समोर आलेली नाही. चीनच्या राजवटीने कोरोनाचे मूळ शोधण्यात निर्माण केलेले अडथळे व नष्ट केलेली माहिती यामुळे साथीच्या उगमावरून अद्यापही वादविवाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संसदीय समितीचा अहवाल लक्ष वेधून घेणारा ठरतो.

अमेरिकी संसदेतील ‘सिनेट कमिटी ऑन हेल्थ, एज्युकेशन, लेबर ॲण्ड पेन्शन्स’ने नवा अहवाल सादर केला. हा अहवाल सादर करण्यापूर्वी कोरोनासंदर्भात आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या विविध अहवालांचा अभ्यास करण्यात आल्याची माहिती समितीच्या सदस्यांनी दिली. त्यातून समोर आलेले निष्कर्ष व इतर माहितीच्या आधारावर निष्कर्ष मांडण्यात आल्याचे समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले. ‘कोरोना-१९ साथीचा उगम संशोधनादरम्यान झालेल्या घटनेतूनच झाला आहे. कोरोनाचा उगम नैसर्गिकरित्या झाल्याचे पुरावे ठरु शकतील असे दुवे उपलब्ध नाहीत’, असा निष्कर्ष समितीने नोंदविला आहे.

The_Covid_pandemicकोरोनाच्या उत्पत्तीसंदर्भात ठाम निष्कर्ष न निघण्यामागे चीनचे अपारदर्शक धोरण कारणीभूत आहे. संशयाचा फायदा देऊन साथ नैसर्गिक असल्याचा चीनचा दावा खरा मानता येणार नाही, अशा शब्दात चीनवर टीकास्त्र सोडण्यात आले. २०१९ साली कोरोना साथीला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाचा उगम चीनच्या वुहान शहरातील लॅबमधूनच झाल्याचे दावे केले होते. ट्रम्प यांचे हे दावे अनेकांनी फेटाळून लावले होते. पण गेल्या दोन वर्षात कोरोनाचा उगम वुहान लॅबमधून झाल्याचा निष्कर्ष नोंदविणारे अनेक अहवाल आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याला दुजोरा मिळत आहे. आता अमेरिकी संसदेच्या अहवालानेही माजी राष्ट्राध्यक्षांच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

दरम्यान, चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे वृत्त समोर येत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनमधील २०हून अधिक शहरांमध्ये लॉकडाऊन लादण्यात आला असून त्यात वुहान तसेच तिबेटची राजधानी असणाऱ्या ल्हासाचाही समावेश आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये गेले काही दिवस दररोज एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

leave a reply