पाकिस्तानने अमेरिकेला लष्करी तळ दिलेला नाही – पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

इस्लामाबाद – अफगाणिस्तानच्या सीमेजवळील आपल्या भागात पाकिस्तानने अमेरिकेला लष्करी तळ उपलब्ध करून दिल्याचे उघड झाले होते. रशियन, इराणी व अफगाणी वृत्तसंस्थांनी तशा बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. यामुळे अडचणीत आलेल्या पाकिस्तानने घाईघाईने ही बातमी खोडून काढली आहे. आपल्या देशाने अमेरिकेला लष्करी तळ दिलेला नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला जाहीर करावे लागले. तसेच या मुद्यावर चीनने पाकिस्तानला थेट धमकी दिल्याचे दावे पाकिस्तानी पत्रकारांनी केले. अमेरिकेला लष्करी तळ दिला, तर पाकिस्तान चीनविरोधी आघाडीत सहभागी झाला आहे, असेच मानले जाईल, असे चीनने धमकावले आहे.

अमेरिकेला लष्करी तळअफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील खुर्रम भागात अमेरिकेला लष्करी तळ उभा राहिला आहे. इथे दररोज आठ ते दहा अमेरिकी हेलिकॉप्टर्स उड्डाण करीत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तसेच या तळाच्या सुरक्षेसाठी नव्या चौक्या उभारण्यात आल्याचेही स्थानिकांनी सांगितले. रशियन, इराणी व अफगाणी माध्यमांनी याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. यामुळे काहीही झाले तरी अमेरिकन सैन्याला पाकिस्तानात पाय ठेवू दिला जाणार नाही, अशी घोषणा करणारे पंतप्रधान इम्रान?खान यांचे सरकार अडचणीत आले आहे. पाकिस्तानची माध्यमे व विश्‍लेषक यावर गंभीर चिंता व्यक्त करीत आहेत. पाकिस्तानच्या सरकारने संसद व जनतेला विश्‍वासात न घेता, अमेरिकेला तळ देण्याचा निर्णय घेतला का? असा प्रश्‍न माध्यमांकडून विचारला जात आहे.

यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना खुलासा द्यावा लागला. पाकिस्तानने अमेरिकेला लष्करी अथवा हवाई तळ उपलब्ध करून दिलेला नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झईद हफीज चौधरी यांनी म्हटले आहे. मात्र विश्‍वासार्हता गमावलेल्या पाकिस्तानच्या सरकारने दिलेली ही माहिती खरी आहे का, असा नवा प्रश्‍न यामुळे उपस्थित होत आहे. अमेरिकेला नाही म्हणण्याची धमक व पर्याय पाकिस्तानच्या सरकारकडे असू शकतो का, असा प्रश्‍न काही जबाबदार पत्रकार विचारत आहेत.

अफगाणिस्तानातील अमेरिकेची सैन्यमाघार बर्‍याच प्रमाणात पाकिस्तानातील अमेरिकेच्या लष्करी तळावर अवलंबून असेल. कारण अमेरिकेला हा तळ मिळाल्याखेरीज अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवणे अमेरिेकला खूपच अवघड जाऊ शकते. म्हणूनच तालिबानवर हल्ले चढविण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानच्या सीमेत हवाई तळ हवा आहे. त्यासाठी पाकिस्तानने परवानगी नाकारली, तर अमेरिका पाकिस्तानचा निकाल लावल्याखेरीज राहणार नाही, असा इशारा काही पत्रकार देत आहेत.

महासत्ता असलेली अमेरिका पाकिस्तानला ‘एफएटीएफ’च्या काळ्या यादीत टाकून दिवाळखोर बनवू शकेल. पाकिस्तानचा व्यापार, पाकिस्तानात येणारी गुंतवणूक रोखून अमेरिका आपल्या देशाची दैना उडविल, अशी भीती या पत्रकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमेरिकेची मागणी मान्य करण्यावाचून पाकिस्तानसमोर दुसरा पर्याय असूच शकत नाही, याकडे हे पत्रकार लक्ष वेधत आहेत. तर दुसर्‍या बाजूला पाकिस्तानने अमेरिकेला तळ दिला, तर अफगाणिस्तानातले युद्ध पाकिस्तानात दाखल होईल, अशी चिंता काही विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. या निर्णयानंतर तालिबानचे दहशतवादी पाकिस्तानात दहशतवादी हल्ले चढवतील. इतकेच नाही तर चीन, रशिया, इराण हे देश पाकिस्तानच्या विरोधात जातील, अशी भीती पाकिस्तानी माध्यमातील या गटाकडून व्यक्त केली जाते.

अमेरिकेला तळ दिला तर पाकिस्तान अमेरिकेच्या चीनविरोधी आघाडीत सहभागी झाला, असेच मानले जाईल, अशी धमकी चीनने दिली. यानंतर चीन पाकिस्तानात सीपीईसी प्रकल्पाच्या अंतर्गत करीत असलेली गुंतवणूक थांबवून हा प्रकल्प गुंडाळून टाकेल. शिवाय सर्वच पातळ्यांवरील द्विपक्षीय संबंध संपुष्टात येईल, असे चीनने पाकिस्तानला बजावले आहे. म्हणूनच पाकिस्तानने अमेरिकेला तळ देण्याची चूक करू नये, असे पाकिस्तानातील अमेरिकाविरोधी गटाला वाटत आहे. त्यामुळे अमेरिकेला लष्करी तळ उपलब्ध करून दिला किंवा दिला नाही, तरी पाकिस्तानला भयंकर परिणामांचा सामना करावा लागेल, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

म्हणून सध्या तरी अमेरिकेला तळ देऊन अधिकृत पातळीवर याबाबत येणार्‍या बातम्या नाकारण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला असावा, असे संकेत मिळत आहेत. मात्र फार काळ पाकिस्तानचे सरकार याबाबतची खरी माहिती दडवू शकणार नाही. माध्यमांमध्ये याबाबतची माहिती आत्तापासूनच उघड होऊ लागल्याने पंतप्रधान इम्रान?खान यांची कोंडी झाल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचा विरोधी पक्ष देखील या प्रश्‍नावर सरकारची कोंडी करण्याची तयारी करीत आहे.

leave a reply